
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पालघर– रवि राठोड
पालघर जिल्ह्यातील विविध गंभीर प्रश्नांसंदर्भात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने या भेटीत वाढवण बंदर, स्मार्ट मीटर, जलप्रदूषण, महामार्गांचे निकृष्ट काम आणि भरपाईप्रश्नी सविस्तर चर्चा करत ठोस मागण्या मांडल्या.
या शिष्टमंडळाने वाढवण बंदरामुळे बाधित होणाऱ्या दांडी, उछळी, नवापूर आणि झाई या मच्छीमार गावांचा यादीत समावेश करण्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या भागात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी घरात शिरत असून, शेकडो कुटुंबांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागाचा त्वरित सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने मांडली.
याशिवाय अदानी समूहाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याची कारवाई सुरू असून, नागरिकांची पूर्वसंमती न घेता ही सक्ती केली जात आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी असून, अशा प्रकारे सक्ती केल्यास शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.
दरम्यान, मुरबे येथील जिंदाल उद्योग समूहाच्या प्रस्तावित बहुउद्देशीय बंदराबाबत स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या प्रकल्पासंदर्भात वस्तुस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांना व ग्रामस्थांना स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी झाली. यावर जिल्हाधिकारी जाखड यांनी स्पष्टीकरण देताना, संबंधित प्रकल्प समुद्रात होणार असून, परिसरातील शासकीय जमिनीचा करार शासनाशी झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या प्रस्तावानंतर ग्रामपंचायतींना माहिती दिली जाईल तसेच जनसुनावणीही घेतली जाईल, असे आश्वस्त केले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पालघर जिल्ह्यात झालेले निकृष्ट दर्जाचे काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, तसेच तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे वाढत असलेले जल व वायू प्रदूषण याकडेही लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली की, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण आदिवासी भागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये तत्काळ कारवाई करावी.
सुमारे दोन तास चाललेल्या या चर्चेत जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्या स्वतः लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, माजी आमदार अमित घोडा, शिवसेना पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर, सुनील इभाड, संजय चौधरी, राहुल घरत, आदित्य अहिरे, विविध सरपंच, मच्छीमार सोसायटीचे प्रतिनिधी व शिवसेनेचे इतर जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.