
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर (डहाणू)राज्यातील सार्वजनिक कामांचे थकीत बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे ठेकेदारांचे जीवन संकटात आले आहे. सांगली जिल्ह्यातील ठेकेदार हर्षल पाटील यांनी या तणावातून आत्महत्या केली आणि त्याच धर्तीवर आता पालघर जिल्ह्यातील ठेकेदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, मत्स्य व ग्रामविकास विभागांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण करूनही ठेकेदारांना दोन वर्षांपासून पैसे मिळालेले नाहीत. सध्या सुमारे १.२० ते १.४५ लाख कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या सरकारने केवळ १० हजार कोटींचेच बिल दिले. त्यामुळे अनेक ठेकेदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यांच्या घरखर्चासह मजुरांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी, आरोग्य व शिक्षण यावर गदा आली आहे.
याच आर्थिक विवंचनेतून सांगलीतील ठेकेदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. त्याच पावलावर पालघर जिल्ह्यातील ठेकेदार निमिल गोहिल हेही चालले असून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “१४ ऑगस्टपर्यंत बिले मिळाली नाहीत, तर मी मच्छीमार विभागाच्या आयुक्त कार्यालयात पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे.”
गोहिल यांनी पालघर जिल्ह्यात मच्छीमार विभागांतर्गत ₹४.७२ कोटींचे काम पूर्ण केले असून मोजमाप पुस्तिका, गुणवत्ता प्रमाणपत्रे सर्व मंजूर आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ‘निधी उपलब्ध नाही’ या कारणावरून त्यांना पैसे दिले गेलेले नाहीत. खासदार डॉ. हेमंत सवरा व आमदार राजेंद्र गावित यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला, मात्र कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
या सर्व प्रकारामुळे राज्यभरात ठेकेदारांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठेकेदारांनी आता नवीन निविदा भरायला नकार दिला असून रस्ते, पूल, पाणीपुरवठा यासारखी विकासकामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना पावसाळ्यात खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.
राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन ठेकेदारांची थकीत बिले वितरीत करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा सांगलीनंतर आता पालघरमध्येही अशाच प्रकारची शोकांतिका घडू शकते.