
आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.
त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे यवतमाळमधील शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री संजय राठोडदेखील उपस्थित होते.
यवतमाळमध्ये अनेक सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशांच्या यादीत तेजस ठाकरे हे नाव देखील होते. हे नाव ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. तेजस ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेजस ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी बळकटी मिळेल असे म्हटले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्याने पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत केले. या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आणि मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील विजयी घोडदौड आणखी मजबूत होईल. हे सर्वजण खऱ्या शिवसेनेत परतले आहेत. गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे झाली. या सरकारने ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ या सर्वांना चांगले दिवस देण्याचे काम केले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीला २३२ जागा मिळाल्या आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. ज्यांची सरकार येण्याची स्वप्ने होती, ती धुळीस मिळाली. हा विश्वास सार्थ करण्यासाठी महायुती सरकार वेगाने काम करत आहे. दररोज लोक मोठ्या विश्वासाने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा डौलाने फडकेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेशाची यादी
यवतमाळ जिल्ह्यात काल झालेल्या पक्षप्रवेशाची यादी समोर आली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तब्बल २५ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यात अनेक माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक
- पवन जयस्वाल: माजी नगराध्यक्ष, नेर
सुनीताताई जयस्वाल: माजी नगराध्यक्ष, नेर
वनिताताई मिसळे: माजी नगराध्यक्ष, नेर
संदीप गायकवाड: नगरसेवक
दिलीप मस्के: नगरसेवक
सरिता मनोज सुने: नगरसेविका
दर्शना लोकेश इंगोले: नगरसेविका (काँग्रेस)
साजिद शरीफ: नगरसेवक
उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे पदाधिकारी - रिझवान खान: माजी जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडी
अविनाश देशमुख: शहर समन्वयक, महागाव
तेजस ठाकरे – ठाकरे गटाचा कार्यकर्ता
रूपेश ठाकरे: सवना
अमोल जाधव (पाटील): आमनी
शुभम राठोड: महागाव
निलेश भारती: आमणी (बु.)
काँग्रेस आणि इतर प्रमुख पदाधिकारी - लोकेश इंगोले: काँग्रेस जिल्हा सरचिटणीस
राकेश नेमनवार: माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी उपसभापती (पंचायत समिती)
संतोष बोडेवार: उपसभापती (पंचायत समिती)
अभय डोंगरे: माजी उपसभापती
गणेश शीलकावार: सामाजिक कार्यकर्ते
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सहकारी संस्था पदाधिकारी - राकेश नेमनवार: संचालक
संतोष बोडेवार: संचालक
अभय डोंगरे: संचालक
विलास ठाकरे: विविध सहकारी संस्था अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
राहुल देहणकर: विविध सहकारी संस्था संचालक