
लोकांना आक्षेपार्ह…
विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळतानाचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
त्यात एका पत्रकार परिषदेमध्ये ‘सरकार भिकारी’ आहे असे वक्तव्य केल्याने कोकाटेंची गच्छंती निश्चित मानली जात होती. मागील दोन दिवसांपासून तशा जोरदार चर्चा होत्या. मात्र, माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांना अभय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेण्यात आले. मात्र, त्यांना मंत्रिमंडळातून निरोप न देता क्रिडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर, क्रिडा खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले. राजीनामा न घेता कोकाटेंना दुसरे खाते दिल्याने विरोधकांकडून सरकारवर टीक करण्यात येत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे.
‘साम टिव्ही’शी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ज्या चुका केल्या त्या मान्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यातून महाराष्ट्रातील लोकांना सांगितले आहे. कोण कुठल्या खात्याचा मंत्री याला फार महत्त्व नसतं. पण लोकांना आक्षेपार्ह वाटेल अशा गोष्टी माननीय मुख्यमंत्री यांनी करणं म्हणजे याचा अर्थ त्यांना या गोष्टी मान्य केल्या आहेत.’
आमचे लक्ष राहील…
रोहित पवार यांनी देखील कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलावर म्हटले आहे की, कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा !