
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. “हे चुकीचं आहे. कुणालाही भाषेच्या आधारावर मारणं योग्य नाही.
महाराष्ट्रात तु्म्ही राहतात म्हणून तुम्हाला मराठी आली पाहिजे हा आग्रह ठिक आहे. पण हा दुराग्रह होता कामा नये. तुम्ही कुणी मराठी बोलत नाही यासाठी कुणाला मारु शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्यदेखील चुकीचं असल्याचं म्हटलं.
“नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे. त्यांना खरंतर वेगळं बोलायचं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, तुम्ही मराठी येत नाही म्हणून हिंदूंना मारत आहेत. इतर लोकं देखील आहेत ज्यांना मराठी बोलत नाहीत त्यांना का मारत नाहीत? नितेश राणे जे बोलले ते एकप्रकारे बरोबर आहे आणि दुसरीकडे चुकीचं देखील आहे. केवळ भाषेच्या आधारावर किंवा कोणत्या धर्माची लोकं ही भाषा बोलत नाहीत या आधारावर हे डिस्क्रिमिनेट होऊ शकत नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा भाषेचा वापर व्हायला नको, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण झाल्याच्या दोन-तीन घटना निश्चित झाल्या आहेत. जो घटना करणार त्याच्यावर आमचं सरकार कारवाई करणार. मी आधी हे सांगतो की, महाराष्ट्रात मराठी शिकण्याची सक्ती आहे. आम्ही ती सक्तीची केली आहे. त्याबाबत आमचं कोणतंही कॉम्प्रमाईज नाही. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे असा आग्रह करणं चुकीचं नाही. पण कुणी मराठी बोलू शकत नाही तर त्याला तुम्ही मारणार हे आमच्या सरकारला मंजूर नाही. असं जो करणार त्यावर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणार”, असं देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील शाब्दिक संघर्ष वाढतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.