
भाजपचे निशिकांत दुबे पुन्हा बरळले; मनसेचा थेट इशारा…
मागील काही दिवसांपासून भाजप खासदार निशिकांत दुबे मराठी यांनी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘हिंदी विरुद्ध मराठी’चा वाद पेटला आहे.
दुबे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्राचे प्रमुख राजकारणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दुबे यांनी मोठे विधान केले. पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल,” असा दावा दुबे यांनी केला. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
मुंबईत हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान
मुंबईच्या निर्मिती आणि अर्थकारणात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान असल्याचा जुना मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला. आमचे मुंबईच्या अर्थकारणात तितकेच योगदान आहे. मग आम्हाला मारहाण का केली जाते?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपल्या दाव्याचे समर्थन करताना दुबे यांनी मुंबईतील मतदारांची आकडेवारी सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत फक्त 30 टक्के लोक मराठी बोलतात, 30 टक्के लोक हिंदी बोलतात, तर उर्वरित लोक राजस्थानी, गुजराती आणि भोजपुरी बोलतात. त्यामुळे ठाकरे बंधूंचे भाषिक राजकारण यावेळी अपयशी ठरेल, असा देखील दावा निशिकांत दुबे यांनी केला.
मनसे आणि ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दुबे यांना इशारा देत म्हटलं की, निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येतात याची आम्ही वाट पाहतोय. आम्हाला त्यांचं स्वागत आमच्या पद्धतीने करायचं आहे. दुबे यांच्यामागे कोणीतरी वेगळा ‘बोलवणारा धनी’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, दुबे यांना जास्त महत्त्व देऊ नका. हा व्यक्ती मराठी माणसाच्या विरोधात बोलतोय, तरीही राज्यातील सरकारमधील कोणीच त्याला विरोध करत नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 लोकांनी हौतात्म्य पत्करले, त्यात दुबे नव्हते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असंही राऊत म्हणाले. दुबे मुंबईत पैसे कमवायला आले आहेत कारण त्यांच्या राज्यात नोकऱ्या नाहीत. ते मराठी माणसाच्या पोटावर मारून मुंबईला लुटत आहेत, असे गंभीर आरोपही राऊतांनी केले.