
आज दादर कबूतर खाना परिसरात जैन समाजाच आक्रमक आंदोलन पहायला मिळालं. सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास या आंदोलनाची सुरुवात झाली. सुरुवातीला आंदोलन स्थगित झाल्याची बातमी आलेली. पण नंतर जैन समाज मोठ्या संख्येने त्या परिसरात पोहोचला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने हा कबूतर खाना बंद केला होता. आंदोलकांनी ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तिथे दाणे टाकले. या आंदोलनात महिला सुद्धा आघाडीवर होत्या. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आत कबूतर खान्यामध्ये घुसले व त्यांनी ताडपत्री सोडवून कबूतर खाना सुरु करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या प्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका बदलल्याच दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतर खाना बंद केल्यानंतर मनसेनं या निर्णयाच स्वागत केलं होतं. कबूतरं आणि त्यांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे वेगवेगळे आजार होत असल्याने कबूतर खाने मानवी वस्तीपासून दूर असावेत अशी मनसेनं भूमिका घेतलेली. पण आज जैन समाजाच्या आक्रमक आंदोलनानंतर मनसेने या विषयावर बोलण्यास नकार दिला.
संदीप देशपांडेंचा बोलण्यास नकार
मनसे नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. एरवी धडाडीने बोलणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा या मुद्यावर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे कबूतर खान्याबद्दल मनसेची भूमिका बदलली, अशी चर्चा सुरु झाली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
“जैन समाज आक्रमक होतो. त्यांचाच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना आत्ता जाग आली. या लोकांनी आधी सगळया गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. 93 वर्षापूर्वीचा हा कबुतरखाना आहे. तुम्ही स्वत: इतरांना हिंदू मानत नाही. तुम्ही हिंदू, आम्ही सनातनी असं मानता. हिंदू सनातनीमध्ये पशू, पक्षी आणि प्राणीमात्रांवर दया करा असं सांगितलय” असं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्या मुंबईच्या माजी महापौर आहेत. “कबुतरांमुळे श्वसानेच आजार होतात हे आता उघड झालय. वेळीच पर्याय दिला असता, व्यवस्था केली असती, तर एवढा समाज अंगावर आला नसता” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.