
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीतील नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले हे राजीनामासत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी गेले असतानाच बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे.
दिल्ली येथे इंडिया आघाडीची बैठक होत असल्याने माजी मुख्यमंत्री सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेणार आहेत तर राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनला ते हजेरी लावणार आहेत. त्यासाठी बुधवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला हजर असेलेले शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तडकाफडकी त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. विठ्ठल मोरे यांनी राजीनामापत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे.
पक्ष कठीण परिस्थितीमध्ये असताना उपनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागत असल्यामुळे मला यातना होत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. पहिले ३ वर्षांमध्ये बेलापूर विधानसभा मतदार संघाचा संपर्कप्रमुख होता. त्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उपनेतेपद देऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्राची जबाबदारी सोपवून मला प्रोत्साहित केले. मातोश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून याचा मला नेहमीच अभिमान राहिल’, असे विठ्ठल मोरे यांनी म्हटले आहे.
‘माझ्या हॉटेलवर एकनाथ शिंदे यांनी छापा टाकायला लावला, अनधिकृत बांधकाम नसूनही मध्यरात्री साडेतीन वाजता माझ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. हा प्रकार तीनदा होऊनही पक्षातून राजीनामा देण्याची माझी मानसिकता झाली नाही. पण एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते काम राजन विचारे यांनी सहज केले. माझ्या मनात खेद आहे’, असे विठ्ठल मोरे यांनी सोशल पोस्टमध्ये लिहिलेले आहे.