
सुप्रिया सुळे म्हणाल्या; ते तर…
इडिया आघाडीच्या नेत्यांची नुकतीच दिल्ली बैठक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही नुकतेच तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. काल दिल्लीत इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीत राहुल गांधी हे मतांची गोळाबेरीज आणि मतांची हेराफेरी यावर बोलले.
मात्र याच बैठकीतील एक फोटो व्हायरल झाला असून त्यामध्ये उद्धव टाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे खूप मागे, शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत होते. हाच मुद्दा उचलून धरत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरेंवर टीका करत ट्विट वॉर सुरू केलं. त्यांनी या फोटोवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला केला.
आता हा वाद चांगला पेटला असून त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं असून म्हस्के यांना गांडूळ म्हणत टीका केली. दरम्यान या सर्व मुद्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार, सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर होणारी टीका हास्यास्पद आहे असं त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका होत आहे ती अतिशय हास्यास्पद आहे,अतिशय बालिश आरोप आहेत. ते एक इनफॉर्मल गेट टूगेदर होतं,कोणीही कुठे बसलं होतं. अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते, प्रोफेसर पहिल्या रोमध्ये होते. आदरणीय पवार साहेब हे तिसऱ्या की चौथ्या रांगेत होते. बसण्याची अशी काही ठराविक सिस्टीम नव्हती तिथे. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब , एकत्र जेवण्यासाठी तिथे बोलावलं होतं. तो काही सरकारी कार्यक्रम नव्हता. मला विचाराल तर उद्धवजी हे सगळ्यात चांगल्या सीटवर बसले होते, कारण ते स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोब्बर मधली सीट त्यांची होती. ते सगळ्यात चांगल्या जागी होते, कारण त्यांना व्यवस्थित ती स्क्रीन दिसत होती, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा अतिशय बालिश असल्याचा पुनरुच्चार केला.
निवडणूक आयोगावर आरोप, मग भाजप का उत्तर देतोय ?
दरम्यान काल राहुल गांधीनी मतांच्या चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. मात्र त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधीवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. यावरूनच आता सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
निवडणूक आयोग स्वायत्त आहे, तर मग भाजप का पर्सनल घेत आहे ? राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेत, मग भाजप का उत्तर देतंय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीत काय घडलं ?
काल सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्याबद्दलही त्या मोकळेपणे बोलल्या. काल हॅण्डलूम डे होता, त्यानिमित्त काल मी पंतप्रधान मोदी, मल्लिकार्जून खर्गे आणि सोनिया गांधी यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना महाराष्ट्राची खास पैठणी भेट दिली. भेटीवेळी त्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पवार साहेब करत असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही त्यांनी नमूद केलं.