
जर तसं झालं तर…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. टॅरिफ लादल्यामुळे इतर देशांच्या निर्यात आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे.
अमेरिकेने भारतीय उत्पादनावर सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर त्यात वाढ करत आणखी 25 टक्के वाढवले. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेत भारताची 100 रुपयांची वस्तू आता 150 रुपयांना विकली जाणार आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी आपोआप कमी होईल. त्याचा फटका निर्यातदारांना बसणार आहे. अमेरिकेने भारतावर हा टॅरिफ पोटदुखीतून लावला आहे. भारत रशियाकडून तेल आणि हत्यारं विकते घेते. ही बाब अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना खटकली आहे. त्यामुळे त्यांनी भारतावर हा अतिरिक्त कर लादला आहे. दुसरीकडे, भारतानेही शेतकरी, दूध उत्पादक उद्योगांच्या हितासाठी तडजोड करणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारताचा पवित्रा पाहता भारत, रशिया आणि चीन हे देश एका व्यासपीठावर येऊ शकतात. त्यामुळे जागतिक व्यवस्था आणि अमेरिकेवर थेट परिणाम होऊ शकतो.
आरआयसी म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास
रशिया-भारत आणि चीन (आरआयसी) या त्रिपक्षीय देशांची एकजूट बांधण्याची सुरुवात 1990 च्या दशकात सुरु झाली होती. रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांनी यासाठी प्रयत्न केले होते. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना आव्हान देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यवसायिक रणनिती, आर्थिक आणि सुरक्षासंदर्भात मोट घट्ट बांधण्याची होती. 2002 पासून 2020 पर्यंत या तीन देशात 20हून अधिक मंत्रिस्तरीय बैठका झाल्या. पण 2020 नंतर भारत चीन सीमा वाद आणि करोना महामारीमुळे तिन्ही देशातील चर्चा बंद झाली. पण रशिया आणि चीन हे व्यासपीठ पुन्हा सक्रिय करण्याच्या तयारीत आहेत. भारतानेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
भारत, रशिया आणि चीन हे जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहेत. या तीन देशांकडे जागतिक पातळीवर समीकरणं बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे हे तीन देश एकत्र आले तर अमेरिकेचं महत्त्व कमी होऊ शकतं. तसेच आशियाई देशांची ताकद संपूर्ण जगाला कळून येईल. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. या माध्यमातून भारताने अमेरिकेला काय तो स्पष्ट संदेश दिला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ब्रिक्स, भारत-रशिया भागीदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.