
मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं 2100 रूपये कधी मिळणार…
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता 8 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थीं महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
ही माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, “या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून, रक्षाबंधनासारख्या सणाच्या अगोदरच हफ्ता मिळाल्याने महिलांना आर्थिक मदत होईल. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.”
याशिवाय त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेबाबतही भाष्य केले. सध्या या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मंत्रिमंडळ घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक भागांतील महिलांना घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी या योजनेतून थेट आर्थिक मदत मिळते. त्यामुळे रक्कम वाढल्यास लाभार्थी महिलांना अधिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मंत्री तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही योजना केवळ तात्पुरती नसून पुढील काळातही नियमितपणे सुरू राहील. शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे आणि लाडकी बहीण योजना त्याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या निर्णयामुळे रक्षाबंधनाचा आनंद महिलांसाठी आणखी गोड होणार असून, महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.,