
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे सीएमडी मुकेश अंबानी यांना पाकिस्तानने धमकी दिली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी मुकेश आंबानी यांना धमकी दिली.
असीम मुनीर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेतील पाकिस्तानी प्रवासी समुदायाला संबोधित करताना असीम मुनीर यांनी धार्मिक उदाहरण देत मुकेश अंबानींना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. याआधीच त्यांनी भारताला देखील अणुबॉम्बची धमकी दिली होती. भारताने आमच्यावर हल्ला केला तर अर्ध जग घेऊन बुडू, असे विधान त्यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान केले.
असीम मुनीर यांनी अमेरिकेत भाषणासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सूरा फील आणि मुकेश अंबानी यांचा फोटो लावला आहे. याद्वारे त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की पुढच्या वेळी पाकिस्तान काय करू शकतो. मुनीर यांनी धमकी देत सांगितले की, ‘आम्ही भारताच्या पूर्वेकडून सुरूवात करू. ज्याठिकाणी भारताची सर्वात मौल्यवान संसाधने आहेत आणि नंतर पश्चिमेकडे जाऊ.
फील हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ हत्ती होतो. तर सूरा फील हा कुराणातील एक श्लोक आहे ज्यामध्ये सांगितले गेले आहे की कशा पद्धतीने शत्रूंच्या हत्तींवर पक्षांनी दगड टाकले. असीम मुनीर हे हाफिज- ए-कुराण आहेत. याचा अर्थ त्यांनी संपूर्ण कुराण तोंडपाठ आहे. यापूर्वीही भारताविरूद्ध भावना भडकवण्यासाठी अशाच धार्मिक घोषणांचा ते वापर करत असे.
दरम्यान, असीम मुनीर यांनी सिंधू पाणी करार निलंबित करण्याबद्दल भारताला धमकी दिली. त्यांनी भारताला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली. असीम मुनीर यांनी सांगितले की, ‘आम्ही भारताद्वारे धरण बांधण्याची प्रतीक्षा करू आणि जेव्हा भारत असे करेल मग आम्ही १० क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करू. सिंधू नदी ही भारताची कौटुंबिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांचा अभाव नाही.