
महाराष्ट्राच्या विकास व जडणघडणीत गोपीनाथरावांचे मोठे योगदान होते. २०१४ मध्ये काही काळासाठी आम्ही त्यांना केंद्रात मंत्री म्हणून स्थान दिले होते.
तथापि अल्पाधतीच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच परत येतील असा शब्दही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतला होता. तथापि दुर्दैवाने आम्हाला मुंडे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहता आले नाही.
परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आम्ही वाटचाल करीत असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. लातूर येथील जिल्हा परिषद प्रांगणात उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, एखाद्या समाजाचे कल्याण करायचे असेल तर दुसऱ्या समाजाचा दुःस्वास करायचा नाही. कोणत्याही समाजातील शोषित वंचितांचे कल्याण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते, गोपीनाथरावांनी जीवनभर जोपासलेली ही भावना आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर राजकत्यर्त्यांनी जोपासण्याची व माध्यमांनीही ती समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होते.
पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. संभाजी पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेशअप्पा कराड, आ. धनंजय मुंडे, आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, गोपीनाथरावांकडून मला खूप शिकायला मिळाले. सत्तेशी समझोता केला केला तर संपत्तीने मोठा होशील पण नेतृत्वाने नाही. सत्तेशी समझोता करू नको, सत्तेशी संघर्ष कर गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला हा मंत्र मी जपला. पदावर असले की, लोक मागे पुढे असतात पद गेली कीपांगतात, प्रसंगी विचारतही नाहीत.
तथापि मुंडे साहेब यास ठसठशीत अपवाद होते. तब्बल १५ वर्ष सत्तेत नसतानाही एखाद्या मुख्यमंत्र्यांपेक्षाही अधिक रुवाब वाटावा एवढे लोक त्यांच्यासोबत असायचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थ भूमिका बजावली. केलेले आरोप मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही. गृहमंत्री असताना अंडरवर्ल्ड व राजकारणातले गुन्हेगारीकरण संपवण्यासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. टोळीला गोळीने उत्तर द्यायचे हा नियम अवलंबिला. मकोका त्यांनीच लागू केला, एकंदरीत महाराष्ट्राला अंडरवर्ल्डच्या विळ्यातून बाहेर काढण्याचे काम गोपीनाथरावांनीच केल्याचे फडणवीस म्हणाले. अन्य मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून मुंडे यांचे संघर्षयोध्दे व लोकनेते म्हणून विचार मांडले.
माझे पिता सर्वांचे नेता : पंकजा मुंडे
पशुसंवर्धन व पर्यावरण मत्री पंकजा मुंडे या गोपीनाथरावांच्या आठवणीने खूप भावुक झाल्या होत्या. माझे पिता व सर्वांचे नेता गोपीनाथराव मुंडे यांनी वंचित व बहुजनांच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यामुळे त्यांच्या पश्चातही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी जनता लाखोंत आहे. ही जनताच माझ्यासाठी संपत्ती आहे. मुंडे साहेबांनी बेरजेचे राजकारण केले, काय करायचे यापेक्षा काय नाही करायचे हे मला शिकवले. त्यांनी दाखवलेल्या पावलावर मी वाटचाल करीत असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.