
युक्रेनचा मोदींना फोन; ग्रेटभेटीआधीच सगळी हवा घेतली काढून !
सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 15 ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यात भेट होत आहे.
बलाढ्य राष्ट्रांच्या सर्वाच्च नेत्यांची ही महाभेट संपूर्ण जगासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळेच आता या भेटीकडे भारतासह इतरही महत्त्वाच्या राष्ट्रांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ही भेट होण्याआधीच युक्रेनकडून मोठे डावपेच खेळले जात आहेत. नुकतेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे.
जगभरातील राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात आज संध्याकाळी फोनवरून चर्चा झाली. झेलेन्स्की यांनी इतरही राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत फोनवरून संवाद साधत रशियाकडून केल्या जाणाऱ्या कारवायांची माहिती दिली. रशियाकडून आगळीक केली जात आहे, असे सांगत युक्रेनकडून जगभरातील राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच पुतिन आणि ट्रम्प यांची भेट होणार असल्यामुळे युक्रेनच्या या प्रयत्नांना फार महत्त्व आले आहे.
झेलेन्स्की मोदी यांच्या फोनकॉलमध्ये काय बोलणं झालं?
झेलेन्स्की यांनी मोदींशी बातचित केल्यानंतर या चर्चेचा वृत्तांत एक्स या समाजमाध्यमावर अपलोड केला आहे. या पोस्टनुसार झेलेन्स्की यांनी मोदी यांना रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाची माहिती दिली. रशियाने कालच (10 ऑगस्ट) आमची शहरं, गावांवर एअर स्ट्राईक केली आहे. रशियाने Zaporizhzhia या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात बसस्थानक उद्ध्वस्त झाले. अनेक लोक जखमी झाले. एकीकडे युद्ध संपण्याची वेळ आलेली असताना रशियाकडून अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत. शस्त्रसंधीसाठी तयार होण्याऐवजी रशिया लोकांना मारण्यात तसेच जमीन बळकावण्यातच इच्छूक असल्याचे दिसत असल्याचे मोदींना सांगितले आहे, अशी माहिती झेलेन्स्की यांनी दिली.
फोन कॉल स्ट्रॅटेजीमुळे ट्रम्प यांच्या प्रयत्नांना हरताळ
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण इकडे झेलेन्स्की संपूर्ण जगाला फोन कॉल करून आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे एकीकडे शस्त्रसंधी आणि समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी झेलेन्स्की यांच्या फोन कॉल स्ट्रॅटेजीमुळे या प्रयत्नांना हरताळ फासला जातो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.