
राज्यातील गतवर्षीच्या खरीप हंगामातील सुमारे 15 लाख 25 हजार 707 शेतकर्यांना येत्या सोमवारी (दि.11) सुमारे 809 कोटी रुपयांची प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होणार आहे.
शिवाय रब्बी हंगाम 2024-25 मधील 95 हजार 548 शेतकर्यांना सुमारे 112 कोटी 27 लाख रुपये सुध्दा मिळणार आहेत. म्हणजेच दोन्ही मिळून राज्यात पीक विमा नुकसान भरपाईपोटी 921 कोटी 45 लाख रुपये मिळणार आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते राजस्थानमधील झुंझुनू येथून ही पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम एका कार्यक्रमाद्वारे वितरित करण्यात येत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप 2022 ते रब्बी 2024-25 मधील पिकांच्या नुकसान भरपाईचा त्यामध्ये समावेश आहे. खरीप हंगाम 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे देय रक्कम 254.98 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीचे 5.02 कोटी, काढणीपश्चात नुकसान भरपाई 526.79 कोटी आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित 22.39 कोटी मिळून सुमारे 809 कोटी 18 लाख रुपयांचा समावेश असल्याचेसांगण्यात आले.
दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप 2024 मध्ये एकूण 4 हजार 397 कोटी 34 लाख रुपये मंजूर नुकसान भरपाई आहे. त्यापैकी शेतकर्यांना सुमारे 3 हजार 588 कोटी 16 लाख रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत.
गतवर्षातील रब्बी हंगामातील 112.27 कोटी मिळणार…
राज्यात गतवर्षातील रब्बी हंगाम 2024-25 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी 52.42 कोटी, काढणीपश्चात नुकसान भरपाईचे 43.37 कोटी आणि पिककापणी प्रयोगावर आधारित 16.47 कोटी मिळून 112.27 कोटी रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा होतील. यामध्ये एकूण नुकसान भरपाईची मंजूर रक्कम 120 कोटी 2 लाख रुपये असून, त्यापैकी 7.75 कोटी रुपये यापूर्वीच शेतकर्यांना देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.