
दुसऱ्या धर्मियांनी नाही; त्यामुळे हिंदूंचे संरक्षण आमची जबाबदारी – नीतेश राणे
रत्नागिरी-राज्यातील महायुतीचे सरकार हिंदू समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत आले आहे. अन्य धर्मियांनी आम्हाला मतदान केले नाही, असे विधान मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे.
महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे, आमचे कर्तव्य असल्याचे राणे म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संवाद साधताना नीतेश राणे उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. इतर धर्मियांनी मतदान केले नाही. तुम्ही मोहल्लात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.
नीतेश राणे म्हणाले, केवळ विकास साधून उपयोग नाही, जर आपल्या राज्यातील महिला सुरक्षित नसतील, तर त्या विकासाला अर्थ नाही. अवतीभवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतात तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावे यांची जाणीव होते. लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार असणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.
राखी संकलन कार्यक्रमाचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले की, राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने आपल्या माता-भगिणींकडे पाहिले जाते. त्याला राखी संकलन हे उत्तर आहे. आज 14 हजार राख्या जमा केल्या असून, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. या उपक्रमामुळे हिंदुत्व अधिक भक्कम होईल.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, ‘लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत आहेत. रत्नागिरीत असे अनेक प्रकरणे होत आहेत. याला एकच सक्षम उत्तर आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत असताना, आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडत असल्याची राज्यातील महिलांची भावना आहे. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, लव्ह जिहाद सारखे विषय करू शकत नाही, अशी भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे, असे नीतेश राणे म्हणालेत.
सरकार आणणे हे कार्यकर्त्याचे काम आहे. त्यामुळे सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला पदे मिळाली आहेत आणि त्यांचा उपयोग कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी केला जाईल, असे नीतेश राणे यांनी म्हटले.