
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी – श्री.विकास पुणेकर
इगतपुरी –देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय, इगतपुरी येथे उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणुन इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माननीय श्री.हिरामणजी खोसकर, इगतपुरी तालुक्याचे तहसिलदार मा.अभिजित बारावकर, इगतपुरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्रीमती.सारिका अहिरराव आदी मान्यवर यांच्या समवेत तहसिल कार्यालयाचे संपुर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग, तालुक्यातील अनेक नेतेमंडळी व इगतपुरी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार अभिजित बारावकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आमदार हिरामणजी खोसकर, तहसिलदार मा.अभिजित बारावकर व पोलिस निरीक्षक श्रीमती.सारिका अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त करीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तहसीलदारांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली व देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रशासनातील पारदर्शकता, जनतेशी संवाद आणि विकासाच्या कामांना गती देण्यावर भर देण्याची ग्वाही दिली.
पोलिस निरीक्षक श्रीमती.सारिका अहिरराव यांनी पोलिस दलामार्फत सुरु असलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियानानिमित्त जनजागृती करत निरोगी जीवनासाठी नागरिकांनी, तरुण मंडळीनी अंमली पदार्थाच्या आहारी न जाता पोषक आहार सेवन करावा व अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या मंडळींना जनजागृती करत अंमली पदार्थाच्या सेवनापासून दूर करावे असे अश्या सुचना देत मार्गदर्शन केले. यावर तहसीलदारांनी देखील आपल्याला स्वराज्य मिळुन ७९ वर्षे झाली असुन जोपर्यंत नागरिक, तरुण मंडळी अंमली पदार्थांपासून दूर जात नाही तोपर्यंत आपल्याला सुराज्य मिळणार नाही असे संबोधले.