
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी : राजेंद्र पिसे
नातेपुते : अक्षय शिक्षण संस्था, नातेपुते घुगरदरे प्रशाला (प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज) येथे आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या सौ. रेश्मादिदी नंदकिशोर धालपे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी संस्था सभापती श्री. हनुमंतराव धालपे, ज्येष्ठ व्यापारी श्री. माणिकराव उराडे, सौ. स्नेहल घुगरदरे, सौ. काव्यांजली धालपे, मुख्याध्यापिका सौ. स्मिता आवळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजवंदना, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि संविधान प्रतिज्ञेनंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विशेष नैपुण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
समारंभाचे सुबक सूत्रसंचालन सुखदेव वलेकर सर यांनी केले. प्रमुख पाहुण्या सौ. रेश्मादिदी धालपे यांनी आपल्या भाषणात शहीद जवान, कष्टकरी शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या योगदानातून आत्मनिर्भर भारत घडत असल्याचे नमूद केले. तसेच ज्ञानोबा माऊली व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रेम, एकता व समरसतेच्या शिकवणीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात स्काऊट व आर.एस.पी. गणवेशातील विद्यार्थ्यांनी मनोहारी मानवंदना सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.