
वास्तव्याचे गूढ उकलले…
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते. दरम्यान, राजीनाम्यानंतर ते दीर्घकाळापासून सार्वजनिक जीवनातून दूर आहेत.
विरोधी पक्षांच्या खासदारांनी, ‘जगदीप धनखड नेमके कुठे आहेत?’ असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबद्दल कोणतीही माहिती का मिळत नाही, अशीही विचारणा होत आहे. परंतु, धनखड सध्या कुठे आहेत, याचा आता खुलासा झाला आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पूर्वी जिथे वास्तव्यास होते, तिथेच आहेत. म्हणजेच, ते सध्या उपराष्ट्रपती निवासातच आहेत. धनखड यांचे कोणतेही निवेदन समोर आले नसले किंवा ते कुठेही दिसले नसले, तरी ते ‘व्हाईस-प्रेसिडेंट एन्क्लेव्ह’मध्येच राहत आहेत, असे समजते आहे.
राज्यसभा सचिवालयाने ६ ऑगस्ट रोजी, धनखड यांचे वरिष्ठ खासगी सचिव असलेले कौस्तुभ सुधाकर भालेकर यांची माजी उपराष्ट्रपतींचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती केली. धनखड गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चर्च रोडवर नव्याने बांधण्यात आलेल्या व्हाईस-प्रेसिडेंट एन्क्लेव्हमध्ये राहण्यास गेले होते. हे निवासस्थान सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उपराष्ट्रपतींचे निवास आणि कार्यालय यासाठी बांधण्यात आले आहे.
२१ जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून, जगदीप धनखड लवकरच उपराष्ट्रपती निवास सोडून त्यांना मिळणाऱ्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित होतील, अशी चर्चा जोर धरू लागली होती. त्यासाठी त्यांनी स्थलांतराची तयारीही सुरू केली होती. मात्र, अद्याप त्यांनी स्थलांतर केलेले नसून ते उपराष्ट्रपती निवासातच राहत आहेत.
उपराष्ट्रपती पद भूषवल्यामुळे, धनखड दिल्लीतील लुटियन्स झोनमधील टाइप-८ सरकारी बंगल्यासाठी पात्र आहेत. हा बंगला अत्यंत प्रशस्त असून तो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांना दिला जातो. साधारणपणे, याचे क्षेत्रफळ आठ हजार ते साडेआठ हजार चौरस फूट इतके आहे.
जगदीप धनखड कुठे आहेत – विरोधकांचा प्रश्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्यासह अनेक नेत्यांनी जगदीप धनखड कुठे आहेत, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, ”माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचा सध्याचा पत्ता काय आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबद्दल काहीही स्पष्टता नाही. राज्यसभेच्या काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच समजले नाही.