
खरंच बैठक भारताने केली हायजॅक; ती मोठी अपडेट काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या केंद्रस्थानी युक्रेन असेल असे निश्चित मानण्यात येत होते.
पण बैठकीपूर्वी आणि नंतरही ट्रम्प यांनी भारताच्या नावाचा जप केला. इतकेच काय पुतिन यांनी सुद्धा भारताच्या नावाचा घोष सुरू केला. त्यामुळे ही बैठक भारताने हायजॅक केल्याची मिश्किल टिप्पणी अधिकारी करू लागले. व्लादिमीर पुतिन म्हणाले की मुद्दा सोडवण्यात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना भारताचा उल्लेख केला. रशियाने त्यांच्या एक महत्त्वाचा भागीदार, ग्राहक गमावल्याचा टोला त्यांनी रशियाला लगावला.
शुक्रवारी अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. अर्थातच अगोदरच अंदाज लावल्याप्रमाणे ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीतून काहीच हाती लागले नाही. पुतिन हे काही दबले नाही. त्यांनी ट्रम्प यांची शेखी जिरवली. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांमध्ये चांगली बैठक झाल्याचे सांगितले. तर युक्रेन संकटावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचे ते म्हणाले.
पुतिन यांचा करारा जवाब
पुतिन यांनी अलास्कासाठी निघतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आर्थिक करार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी रशियाने त्यांचा सर्वात जवळचा मित्र, भारत ग्राहक म्हणून गमावल्याचा टोला लगावला. भारत रशियाकडून जवळपास 40 टक्के इंधन खरेदी करतो. हा मित्र गमावल्याने रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. मग त्यांनी चीनकडे मोर्चा वळवला. चीन सुद्धा रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी करतो असे ते म्हणाले. आता चीनवर जर मी अजून मोठे टॅरिफ लादले तर चीनची आणि रशियाची अवस्था वाईट होईल, असा इशारा त्यांनी दिला.
पण भारताचीच चर्चा
युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्यातून काही फलनिष्पत्ती झाली नाही. तर दुसरीकडे या बैठकीपूर्वी आणि बैठकीनंतर पुतिन आणि ट्रम्प यांच्या तोंडी भारताचेच नाव दिसले. दोघांनी भारत हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. रशियाला वठणीवर आणण्यासाठी ट्रम्प यांनी भारत कार्ड खेळल्याचे बोलले जात आहे. तर रशियाने कुटनीतीसाठी भारताची गरज असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे भारताने स्वतंत्र रणनीती आखल्यास अमेरिकेला जेरीस आणता येऊ शकते. काल पंतप्रधानांनी थेट टॅरिफचे नाव घेतले नाही. त्यांनी आता भारत स्वतःची रेषा मोठी करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे.