
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असताना, पीकविम्याच्या नव्या जाचक नियमांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वैयक्तिक नुकसान गृहीत न धरता केवळ महसूल मंडळाच्या सरासरीवर आधारित मदतीच्या नव्या ‘फॉर्म्युल्या’ने बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
कर्ज काढून उभी केलेली सोयाबीन, मका, उडीद यांसारखी पिके डोळ्यांदेखत सडत आहेत. मात्र, या खरीप हंगामापासून बदललेल्या नियमांनुसार, शेतकऱ्याचे १००% नुकसान झाले तरी संपूर्ण मंडळाचे सरासरी उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) कमी झाले नाही, तर त्याला मदत मिळणार नाही. पूर्वीचे महत्त्वाचे निकष काढून टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची आणि हवालदिलतेची भावना आहे. “आमचे वैयक्तिक नुकसान कोणी पाहणार नाही का? आमचे भवितव्य सरासरीच्या आकड्यांवर ठरणार का?” असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत.
नुकतेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ पंचनाम्यांनी प्रश्न सुटणार नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. ही योजना ‘पीडाविमा’ ठरू नये यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून वैयक्तिक नुकसानीचा निकष पुन्हा लागू करावा, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. पारदर्शक पंचनामे आणि थेट आर्थिक मदत ही सध्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.