
ब्राझीलमधील एका गायीने दुग्धोत्पादनात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सर्वांनाच चकित केले आहे. या ‘गिरोलांडो’ जातीच्या गायीने केवळ तीन दिवसांत तब्बल 343 लिटर दूध देऊन एक नवा इतिहास रचला आहे.
हा विक्रम ब्राझीलच्या डेल्फिम मोरेरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका डेअरी स्पर्धेत नोंदवला गेला. गिरोलांडो जात ही विशेषतः जास्त दूध देण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते आणि या गाईने आपल्या जातीची क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. या स्पर्धेत तिने सर्व जुने विक्रम मोडीत काढले.
या गायीची कामगिरी केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर जागतिक पातळीवरही लक्षवेधी ठरली आहे. तिने एका दिवसात 120 लिटर दुधाचे उत्पादन केले, जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या (127.6 लिटर) अगदी जवळ जाणारे आहे. थोड्या फरकाने तिचा जागतिक विक्रम हुकला असला, तरी तिची ही कामगिरी अभूतपूर्व मानली जात आहे. या विक्रमामागे शेतकर्यांचे अथक परिश्रम आणि अनेक महिन्यांची तयारी आहे. या स्पर्धेसाठी शेतकरी आपल्या गायींची विशेष काळजी घेतात. त्यांना उच्च प्रतीचा आणि संतुलित आहार दिला जातो, ज्यामुळे त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते. या गाईचे यश हे केवळ तिच्या जातीचेच नव्हे, तर आधुनिक पशुपालन आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचेही प्रतीक आहे.