
वकिलाच्या दाव्यानं प्रकरणात मोठं ट्विस्ट…
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे, सध्या तो जेलमध्ये आहे.
दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक कराडच्या वतीनं जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी येत्या 30 तारखेला आहे.
या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. वाल्मीक कराडला अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली नव्हती, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
दरम्यान या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी म्हटलं की, वाल्मीक कराड याच्या वकिलाने त्याला जामीन का मिळाला पाहिजे? याविषयी युक्तिवाद केला. त्याला आम्ही विरोध केला. त्याबाबतची कारणे देखील स्पष्ट केली. दुसरा आरोपी विष्णू चाटे याने देखील दोषमुक्तीसाठी युक्तिवाद केला. यावर आम्ही न्यायालयाचे अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधले. अनेक मुद्दे मांडत वाल्मीक कराडच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे, त्यावर येत्या 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे, असं निकम यांनी म्हटलं आहे. दरम्यान वाल्मिक कराडला अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला. परंतु आम्ही ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, असंही यावेळी निकम यांनी म्हटलं आहे.
धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीचे वकील हे आरोपी कसे नाहीत आणि त्यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते. त्याला उज्वल निकम साहेबांनी जोरदार प्रतिउत्तर देत आरोपी कसे आहेत आणि त्यांना जामीन का देऊ नये यावर युक्तिवाद केला. हे आरोपी आहेत आणि यांच्या पाठीमागे कोण आहे हे स्पष्ट झालं आहे, पुढच्या तारखेत चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, नियती कोणालाही सुटू देणार नाही. ही संघटीत गुन्हेगारी आहे, असं यावेळी धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.