
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा !
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींनातर आता लाडक्या सूनांसाठी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या सुनांच्या मदतीसाठी शिवसेनेने एक हेल्पलाइन सुरू केली असून लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा छळ करणारी वृत्ती ही समाजासाठी कलंक आहे.
अशी वृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असा इशाराही शिंदेंनी दिला आहे.
राज्यात एकिकडे लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी नव्या योजनेची घोषणा केली आहे. मात्र, ही योजना सरकारकडून नाही तर शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून राबवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत या योजनेची माहिती शिंदे यांनी दिली आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन ! महाराष्ट्रात आता इथून पुढे आमच्या लेकी-सुनांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कारण महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा छळ करणारी वृत्ती ही समाजासाठी कलंक आहे. अशी वृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. त्यांना अद्दल घडवली पाहिजे. त्यामुळे सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल. त्यासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ हे अभियान आपण हाती घेत आहोत. यापुढे शिवसेनेच्या शाखा हे या लाडक्या सुनांचं हक्काचं माहेर असेल, हे साऱ्यांनीच लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींनी, लाडक्या सुनांनी इथून पुढे कोणत्याची दबावाला बळी पडू नये.
तुमच्यावरचा दबाव झुगारून टाका. लाडक्या सुनांच्या मदतीसाठी शिवसेनेने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. हेल्पलाईन क्रमांक- ८८२८८६२२८८ / ८८२८८९२२८८ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून कुणालाही न घाबरता माहिती द्या. तुमच्या एका फोननंतर शिवसेनेच्या रणरागिणी तुमच्या मदतीला नक्की येतील. कायदेशीर मदत लागली, तर तीही या अभियानाच्या माध्यमातून दिली जाईल. छळ करणाऱ्यांना आधी समजावून सांगितलं जाईल. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर मग काय करायचं, ते आमच्या शिवसेनेच्या रणरागिणींना चांगलं माहीत आहे. नारी शक्ति है, सम्मान है, नारी गौरव है, अभिमान है, नारी ने ही ये रचा विधान है, नतमस्तक इसको प्रणाम है, नारी के सम्मान के खातिर एक कदम हमने बढ़ाया हैI या नारीशक्तीला वंदन करून आज आपल्या सुना सुरक्षित राहतील हा संकल्प करू या. तसेच, ‘लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन !’ हे अभियान यशस्वी करूयात.