
सांगलीत आमदार रोहित पवार यांनी निधीवरून ‘गावकीचा विचार करताना भावकीचा विचार करा’ म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचलं होते. तेव्हाच, अजित पवार यांनी रोहित पवार यांना उत्तर देताना ‘माझे भावकीकडे लक्ष आहे म्हणूनच तर तू आमदार झालास’ असे म्हटले होते.
यावरून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे अजित पवार यांच्यावर चिडल्याचे पाहायला मिळाले आहेत.
अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपच राम शिंदे यांनी केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल निर्णय घ्यावा, असेही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी दुसऱ्यांदा राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला आहे. परंतु, महायुती असताना आणि अजित पवार यांना प्रचाराला बोलावले असताना ते आले नव्हते, असे राम शिंदे यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यानंतर आता शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधाल आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
बारामतीत प्रसारमाध्यमांना बोलताना राम शिंदे म्हणाले, “विधानसभेचा निकाल लागल्यावर कराड येथे अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी रोहित पवार यांना उद्देशून वक्तव्य केलेले की, ‘बेट्या मी आलो असतो, तर काय झाले असते?’ त्यानंतर मी सगळ्या माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. परत, अजित पवार यांनी ‘मी असे बोललोच नाही,’ असे वक्तव्य केले.
अजित पवार यांनी पुन्हा एकदा १६ ऑगस्टला हेच विधान केले. अजित पवार सातत्याने हे बोलून शिळ्या कढीला का उत आणत आहेत? महायुतीतील सर्वोच्च नेता सातत्याने सार्वजनिक ठिकाणी ही भूमिका मांडत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेते चर्चा करतील. या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे. ६२२ मतांनी माझा पराभव झाला आहे. वारंवार हे वक्तव्य करून अजित पवार टॉर्चर करत आहेत, नाउमेद करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
रोहित पवार अन् अजित पवार काय म्हणलेले?
इस्लामपूरमध्ये एक कार्यक्रमात अजित पवार यांना उद्देशून बोलताना रोहित पवार यांनी म्हटलेले, “दादा, तुम्ही गावकीचा विचार करता, तसा भावकीचा पण जरा करत जावा. निधीबाबत समानता ठेवून जरा आमच्यावरही लक्ष द्या.
रोहित पवार यांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, रोहित तू लई चुरू चुरू बोलायला लागलायस. तुझी गाडी फारच सुसाट निघाली आहे. माझे भावकीकडे लक्ष आहे म्हणूनच तर तू आमदार झालास. जयंतराव, विचारा त्याला, तो पोस्टल मतावर निवडून आला आहे. मी माझ्या पक्षाचे काम करतोय, जयंत पाटील त्यांच्या पक्षाचे काम करतात. पण मी माझ्या पक्षात काय करायचे, याबाबत आता दुसरेच सल्ले देत आहेत. माझ्या पक्षात कोणी काय करायचे, ते मी बघतो. तुम्ही तुमचे बघा. तुम्ही तुमचे काम करा, मी माझे काम करतो. माझ्या कोणी नादाला लागू नका.