
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी :- श्री.विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी पोलिस ठाणे यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलाद यथासांग आणि शांततेत साजरे करण्यासाठी शांतता समितीची बैठक दि.२१ ऑगस्ट २५ रोजी माहेश्वरी मंगल कार्यालय, इगतपुरी येथे आयोजित केली.या बैठकीस इगतपुरी त्रंबकेश्वर उपविभागाचे मा.प्रांताधिकारी, मा.पोलिस अधिक्षक,नाशिक ग्रामिण, नाशिक, मा.पोलिस उपअधीक्षक , नाशिक ग्रामिण, नाशिक, मा.पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, इगतपुरी यांनी मार्गदर्शन व सुचना देऊन बैठक संपन्न केली.
सदर बैठकीस मा.मुख्याधिकारी, इगतपुरी नगरपरिषद, मा.नगराध्यक्ष, इगतपुरी नगरपरिषद, महावितरण चे अधिकारी आदींसमवेत इगतपुरी तालुक्यातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, ज्येष्ठ नागरिक मंडळ, सर्व पक्षांतील पदाधिकारी, इगतपुरी गावातील व तालुक्यातील नागरिक व महिला मंडळ, पोलिस पाटील तसेच पत्रकार उपस्थित होते.
या बैठकीत सर्व पोलिस अधिकारी यांनी गणेश मंडळांना व नागरिकांना मार्गदर्शन केले, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाचा ठोस निर्णय तसेच या सणांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना सांगितल्या. सर्व गणेश मंडळांनी लवकरात लवकर ऑनलाईन परवानगी अर्ज भरून त्याची प्रत इगतपुरी पोलिस ठाणे येथे जमा करावी अशी सूचना दिली. पोलिस अधिकारी यांनी सांगितले की, गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद यांच्या सणांदरम्यान विशेष लक्ष दिले जाईल, जेणेकरून कोणताही अनुशासनभंग किंवा गोंधळ निर्माण होणार नाही. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष नियंत्रण ठेवले जाईल, आणि प्रत्येक समुदायाच्या सुरक्षा आणि शांततेच्या दृष्टीने मदत केली जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.
इगतपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नागरीक व महिला मंडळ यांनी इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या अनेक समस्या व अडचणी मांडल्या. इगतपुरी तालुक्यात पावसाळा सुरु झाल्यापासून वारंवार वेळीअवेळी लाईट जाणे याबाबत महावितरण अधिकारी यांना आपल्या समस्या मांडत त्या सोडविण्यासाठी विनंती केली तसेच इगतपुरी तालुका हा महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळखला जात असुन देखील इगतपुरी शहरात कायम पाणीपुरवठ्याची समस्या असते यासाठी गणेशोत्स्वात का होईना पाणीपुरवठा सुरळीत चालू ठेवावा यासाठी विनंती केली.
यावर सर्व अधिकारी यांनी लवकरात लवकर उपाययोजना करून इगतपुरी तालुक्यातील समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.
समाजातील प्रत्येक नागरिकाने या सणांचा आनंद घेत शांततेत आणि सुरक्षिततेत साजरा करावा, असे आवाहन इगतपुरी पोलिस ठाणे यांनी केले आहे. यावर्षीच्या सणांमध्ये वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती केली.