
राज ठाकरेंनी विचारला लॉजिकल प्रश्न; घरात उंदीर आला म्हणून…
आपल्या घरात उंदीर आला तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदरी घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का?
असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहर व्यवस्थापन विषयावर भेट घेतल्यानंतर नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. कबुतरं, हत्ती या विषयांच्या नावाखाली मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
“आपल्या घरात जर चार उंदीर आले तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदीर घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? म्हणजे माणंस मेलेली चालतात. हा राजकीय विषय असून, तो तसाच लावायचा होता. मग यांच्याकडून प्रतिक्रिया मिळत नाही हे त्यांना दिसलं,” असं ते म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांसोबत टाऊन प्लॅनिंगवर चर्चा’
गेले काही महिने मुख्यमंत्र्यांशी काही महत्त्वाच्या विषयांवर बोलत होतो. त्याचा आराखडा मी त्यांच्यासमोर मांडला. टाऊन प्लानिंग माझ्या आवडीचा विषय आहे. एका स्कॉटिश साहित्यिकाचं चांगलं वाक्य आहे. तुमच्याकडे लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी देशाचं भविष्य सांगतो. मी यात बदल करत सांगतो की, तुमच्याकडे वाहतुकीची परिस्थिती दाखवा. मी देशाचं भवितव्य सांगतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
’50 माणसं राहत होती तिथे 500 माणसं आली’
पुढे त्यांनी सांगितलं की, “मुंबई. ठाणे, नाशिक, नागपूर अनेक शहरं जी उभी राहत आहेत तिथे मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपेंटमची कामं उभी राहत आहेत. तिथे अनधिकृत गोष्टीही होत आहेत. आज जिथे 50 माणसं राहत होती तिथे 500 माणसं आली आहेत. माणसं वाढली, गाड्या वाढल्या आणि ट्राफिक वाढलं. सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत. 26 जुलैला 900 इंच पाऊस पडला होता, परवा 400 इंच पाऊस पडला. ज्याप्रकारची स्थिती निर्माण झाली त्यावरुन रस्ते कमी, वाहतुकीची व्यवस्था नाही, पार्किंग नाही हे दिसत आहे. याचं उत्तर सापडलं नाही. कबुतरं, हत्ती या गोष्टीत इतके अडकलो आहोत, की मुलभूत समस्यांकडे लक्ष नाही.
लोकांना शिस्त लावणं गरजेचं आहे’
“गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग लॉट उभे करण्याची गरज आहे. लोकांना शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातून, प्रदेशातून लोक आलेत त्यांना या शहरात काय प्रकारची व्यवस्था आहे माहिती नाही. डबल पार्किंग करत असतात. मुख्यमंत्र्याना छोटासा आराखडा दिला आहे. मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि सह-पोलीस आयुक्त यांच्यासोबत नियोजित बैठक होती. मी काही नमुने सांगितले,” अशी माहिती त्यांनी दिली.
‘शहरांचेही काही नियम असतात ते पाळायला हवं’
सिस्टम लावण्यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात देऊ. जास्ती दंड किंवा जेल याला लोक घाबरतात. यामुळे दारु पिऊन गाडी चालवणं बंद झालं आहे. वाहतुकीसाठीही असं काही झालं पाहिजे. नो पार्किंगचे बोर्ड पाहत नाहीत आणि गाड्या पार्क करतात. मी आयुक्त आणि सह-पोलीस आयुक्तांनाही सांगितलं आहे. 2014 ला मी छोट्या मैदानांखाली पार्किंग होऊ शकतं असं सांगितलं होतं. अशा प्रकारच्या अनके गोष्टी करता येऊ शकतात. पार्किंग आणि नो पार्किंग असणाऱ्या फुटपाथना रंग द्यायला हवा. केल्या तर काय प्रकारचा दंड आकारला जाऊ शकतो यावर राज्य सरकार काम करत आहे. मॅपमध्येही नो-पार्किंग दाखवलं जावं. याच्यातून थोडी शिस्त लागेल अशी आशा आहे. दोन चाकी वाहनं सिग्नल पाळत नाहीत. दुपारी 12 वाजताही गाड्या थांबत नाहीत. कायद्याला न जुमानणं यातून शहरं उभ राहणार नाहीत. आपण फार वाईट गोष्टीकडे जाऊ. भविष्यात फार गोंधळ दिसत आहेत, जर उपाययोजना झाल्या नाहीत तर बेशिस्तीतून वेगळ्या गोष्टीतून जाणार. गोष्टी हाताबाहेर गेल्यावर कोणी काही करु शकणार नाही. शहरांचेही काही नियम असतात ते पाळायला हवं,” असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.
‘रस्ते बनवणं हा धंदा आहे’
“रस्ते बनवणं हा धंदा आहे. ते खराब झालेच पाहिजेत अशा प्रकारे तयार केले जातात. हा सगळा नेक्सस तसाच आहे. खड्डे बुजवण्यासाठी टेंडर निघतं. जो कंत्राटदार असेल त्याला शिक्षा होत नाही. गेली अनके वर्ष सुरु आहे. लोक याला त्रासले आहेत. अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. पण जे करत आहेत त्यांनाच निवडून देत आहोत. मग आयुष्यात कधीच चांगले रस्ते मिळणार नाहीत. त्यांना वाटत आहे आपण जे करतोय ते बरोबर करत आहोत. हा विषय फक्त मुंबईचा नसून सर्व शहरांचा आहे. बाहेरच्या राज्यातून येतात त्यांना महाराष्ट्राचे खड्डे दिसतात. त्यांची राज्यं खड्ड्यात गेलेली दिसत नाहीत. त्या राज्यांमध्ये काय झालं ते पाहा, असंही त्यांनी सुनावलं आहे.