
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
नवी दिल्ली दि.21 : महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा सामाजिक, सांस्कृतिक अभिसरणामुळे राज्याने देशाच्या योगदानात महत्त्वपूर्ण वाटा उचलला यापुढेही नवनियुक्त उमेदवारांकडून तीच अपेक्षा केली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी मराठी पाऊल तर्फे वर्ष 2024 मध्ये नागरी सेवा परीक्षेत राज्यातून उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात केले.
भरगच्च झालेला एन.डी.एम.सी. कन्व्हेन्शन हॉलमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत हा सत्कार सोहळा चालला. त्यावेळी श्री संजय कुमार बोलत होते. या कार्यक्रमात जवळपास 40 नवनियुक्त अधिकाऱ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास त्या काळात नागरी सेवा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना नवनियुक्त उमेदवारांकडून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे विवेक कुलकर्णी आणि सविताताई कुलकर्णी, तसेच एस.एस.बी. चे अतिरिक्त महासंचालक अनुपमा चंद्रा व सी.आय.एस.एफ. चे अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय शिक्षण खात्याचे संयुक्त सचिव आनंद पाटील, लँड पोर्ट प्राधिकरणाच्या वित्त सदस्य रेखा रायकर, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, सुशील गायकवाड यांच्यावर उपस्थित होते.
श्री संजय कुमार पुढे म्हणाले महाराष्ट्र देशासाठी नेहमीच मार्गदर्शक कार्य करत राहिलेला आहे. पुढचे पाऊल ज्या पद्धतीने राज्यातील मुलांच्या पाठीशी राजधानीत कार्यरत आहे ते कौतुकास्पद आहे. इतर राज्यांनीही प्रेरणा घेतली पाहिजे. भारतीय नागरी सेवेची परीक्षा उत्तीर्ण करणं हे एक जिद्दीचे काम असून यामुळे खऱ्या अर्थाने भारत ओळखण्यास मदत होते. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे कौतुक करून देशाच्या विकासात सकारात्मक योगदान द्यावे अशा अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सी आय एस एफ चे अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे यांनी भविष्यात नागरी सेवेत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आरोग्यकडे दुर्लक्ष न करणे, पेहरावा नीट निटका असणे असा सल्ला दिला. सेवेत आलेल्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना आपल्या स्वभावात सहजता आणण्याच्या सूचना केला. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा आदर्श सदैव बाळगावा, असेही नमूद केले.
एस एस बी च्या अतिरिक्त महासंचालक अनुपमा निळेकर यांनी नवनियुक्त उमेदवारांना मार्गदर्शन करताना सांगितले, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सतत स्व विश्लेषण करीत राहावे. तसेच आपल्याला आवडेल आणि आकलन होईल असेच विषय परीक्षेत निवडावे. तसेच सामूहिक चर्चा करावी. फोकस अभ्यास ठेवावा नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास पर्याय निश्चित करून ठेवावा. यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना विकसित भारत करण्यात हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी सनदी अधिकारी आणि पुढचे पाऊल संस्थापक ज्ञानेश्वर मुळे यांनी अधिकारी झाल्यानंतर त्यांना आलेले अनुभव आणि पुढच्या पाऊल ची सुरुवात याबद्दलची माहिती देत राजधानीत असलेल्या मराठी अधिकारी हा राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसोबतच राज्यातील अनुबंध कायम ठेवत बृहन जगातील मराठी माणसांशीही ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हणाले. मागील सात वर्षापासून पुढचे पाऊल संस्था महाराष्ट्र राज्यातून नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करीत असल्याचे श्री मुळे यांनी यावेळी सांगितले.
ज्ञान प्रबोधनीच्या नीना कुलकर्णी यांनी देहरादून येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय संस्थेत जाणाऱ्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना मातीशी नाळ जुळून ठेवण्याचा सल्ला दिला. विवेक कुलकर्णी यांनी आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची असून अधिकाऱ्यांनी स्वतःला अद्यावत ठेवावे असे सांगितले.
विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा
महाराष्ट्र राज्य मराठी टक्का वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नरत असून त्यामुळे मराठी टक्का वाढण्यास सातत्याने यश मिळत आहे. बार्टी, सारथी, महाजोती आणि आरटीच्या माध्यमातून राज्यातील विविध समूहातून येणाऱ्या उमेदवारांना शिष्यवृत्तीची सुविधा दिली जात आहे.
नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सदन येथे अभिमत मुलाखतीसाठी दरवर्षी सभागृह मोफत उपलब्ध करून दिले जाते.
तसेच नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अभिमत मुलाखतीसाठी युपीएससीमार्फत घेणाऱ्या मुलाखतीसाठी तसेच वैद्यकीय चाचणीसाठी महाराष्ट्र सदनातील खोल्या सात दिवसांकरिता मोफत दिल्या जातात. या सर्व प्रयत्नांमुळे मराठी टक्का वाढत आहे.