
चीन कोणत्याही क्षणी ‘या’ देशावर हल्ला करणार; लष्कराला हाय अलर्ट जारी…
गेल्या काही महिन्यांपासून जगात अशांतता आहे. बऱ्याच देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच आता दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. चीन आणि फिलीपिन्स यांच्यात युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे.
कारण चीनने वादग्रस्त सेकंड थॉमस शोलजवळ आपली तटरक्षक आणि मिलिशिया जहाजे तैनात केली आहेत. त्यामुळे फिलीपिन्सने आपल्या लष्कराला हाय अलर्ट जारी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फिलीपिन्सच्या लष्करी अधिकाऱ्यांनी चीनच्या आक्रमकतेबद्दल माहिती देताना म्हटले की, ‘चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राच्या किनारी भागात बऱ्याच काळापासून उभ्या असलेल्या फिलीपिन्स युद्धनौकांजवळ तटरक्षक आणि मिलिशिया जहाजे तैनात केली आहेत. आमच्या युद्धनौकेभोवती 14 चिनी जहाजे घिरट्या घालत आहेत. यातील काही जहाजांवर घातक शस्त्रे आहेत. तसेच एका जहाजावर हेलिकॉप्टर आणि ड्रोन देखील आहेत, ही जहाजे आणखी जवळ येऊ नये म्हणून फिलीपिन्स सैन्य तैनात करण्यात आले आहे.
सेकंड थॉमस शोल मुळे वाद
सेकंड थॉमस शोल हा समुद्री भाग फिलीपिन्समध्ये अयुंगिन शोल आणि चीनमध्ये रेन’ई रीफ म्हणून ओळखला जातो. हा भाग फिलीपिन्सच्या 200-नॉटिकल मैल एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ) मध्ये स्थित आहे, मात्र चीन हा भाग आपल्या “9-डॅश लाइन”चा हिस्सा असल्याचे म्हणत आहे. 1999 पासून फिलीपिन्सने जाणूनबुजून या भागात BRP सिएरा माद्रे नावाची जुनी युद्धनौका तैनात केली आहे. ही नौका आता एका चौकीचे काम करते. चीनने वारंवार ही सिएरा माद्रे नौका हटवण्याची मागणी केली होती. मात्र फिलीपिन्सने याला नकार दिला होता.
चिनी सैन्याकडून युद्धाची तयारी
फिलीपिन्स सैन्याने एका निवेदनात चीनच्या सैन्याबाबत माहिती दिली आहे. ‘चीनची तटरक्षक जहाजे युद्धाभ्यास आणि सराव करताना पहायला मिळत आहेत. यात अनेक जलद बोटी आणि लहान जहाजांचा समावेश आहे. तसेच काही चिनी तटरक्षक जलद बोटींमध्ये घातक शस्त्रे आहेत. अशी माहितीही फिलीपिन्सच्या सैन्याने दिली आहे.
तणाव वाढला
फिलिपिन्सच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, चिनी सैन्याने जहाजे तैणात केल्यामुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे. आता चिनी जहाजे जवळ येऊ नयेत म्हणून आम्ही बीआरपी सिएरा माद्रेमधील दोन बोटींवर फिलीपिन्स सैनिक तैनात केले आहेत.’ दरम्यान, जून 2024 मध्ये सेकंड थॉमस शोल येथे एक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये फिलीपिन्स नौदलाच्या कर्मचाऱ्यांना दुखापत झाली होती.