
उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नका; ज्योतिषाचं भाकीत !
अजित पवार यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते जवळपास पाच ते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत. आता अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
अमोल मिटकरी, हसन मुश्रीन या नेत्यांनी आपल्या मनातल्या भावना कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या होत्या. अनेक वेळा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे बॅनर देखील राज्यभरात झळकले. अशातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. ‘अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील’, असे भाकित ४३ व्या ज्योतिष अधिवेशनात ज्योतिषांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यामध्ये भरल्या ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनामध्ये राज्यासह देशातील नेत्यांचे भविष्य वर्तवण्यात आले. ‘नरेंद्र मोदी हे पावरफुल आहेत. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेऊ नये. राज ठाकरे यांचं काही होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे पुढे मोठ्या पदावर जातील.’, अशा प्रकारचे भाकित या संमेलनामध्ये ज्योतिषांनी वर्तवले. त्यांनी सांगितलेल्या भाकितामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.
ज्योतिषांनी सांगितले की, ‘पीएम मोदी यांची पत्रिका एवढी मजबूत होती की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केला आहे. त्यांची पत्रिका खूपच मजबूत आहे. पुढील काही वर्षांत मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील.’ देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्योतिषांनी सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस हे एक ‘लंबी रेस का घोडा’ असून ते दिल्लीकडे वाटचाल करतील. दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील.
तर, ‘अजित पवारांची संघर्षाची पत्रिका आहे. अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळेल.’, असंही भाकित ज्योतिषांनी दिले. तसंच, ‘उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये. त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी, राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील.’, असे ज्योतिष म्हणाले.
पुण्यातील वाहतूक कोंडीवर प्रश्न विचारण्यात आले तर त्याचे उत्तर ज्योतिषांकडे नव्हते. पुण्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार? या प्रश्नावर ज्योतिषयी चक्रावले आणि त्यांना उत्तर देता आलं नाही. ५०० हून अधिक लोकांची उपस्थितीत या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई आणि वयोवृद्धांची गर्दी केली आहे. हे संमेलन दोन दिवस चालणार आहे.