
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे म्हटले जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांना धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मोठा नेता लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.
मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते मागील काही दिवसांपासून नाराज असल्याचे म्हटले जात होते. उदय सामंत यांनी खेडेकर यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती. यानंतर वैभव खेडेकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण आता थेट भाजपकडे खेडेकरांना ऑफर मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेत्यांसोबत वैभव खेडेकर यांच्या भेटीगाठी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे यांनी खेडेकरांच्या प्रवेशासाठी लक्ष घातल्याचेही म्हटले जात आहे. आगामी निवडणुकांआधी जर वैभव खेडेकर खरच भाजपमध्ये प्रवेश करणार असतील, तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का असेल.
वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेच्या मोठ्या शिलेदारांपैकी एक आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून वैभव खेडेकर मनसे पक्षात आहेत. ते खेडचे नगराध्यक्ष होते. २०१४ रोजी दापोली मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. युवा, तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. सध्या मनसे पक्षात राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपद अशी मोठी जबाबदारी वैभव खेडेकर यांच्याकडे आहे.