
निवडणुकीतील घोळाबाबत संजय कुमार यांच्यावर दाखल गुन्ह्यात मोठा आदेश…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारयाद्यांतील कथित घोळावरून विरोधकांनी भाजप आणि भारतीय निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे.
लोकनीती-सीएसडीएसचे सहसंचालक संजय कुमार यांनी मतदारांच्या संख्येबाबत केलेल्या ट्विटनंतर वाद वाढला होता. त्यांनी हे ट्विट डिलिट करून माफी मागितली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
संजय कुमार यांनी महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टाने संबंधित गुन्ह्याला अंतरिम स्थगिती देत संजय कुमार यांना दिलासा दिला आहे.
संजय कुमार यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणू दिले की, ‘संजय कुमार यांनी चूक मान्य करून माफीही मागितली आहे. ते खूप आदरणीय व्यक्तिमत्व आहे. माफी मागूनही गुन्हा दाखल करण्यात आला.’ त्यानंतर कोर्टाने गुन्ह्याला स्थगिती देत पोलिसांनी नोटीस बजावली. सामान्यपणे आम्ही असे करत नसल्याची टिप्पणीही सरन्यायाधीशांनी केली.
काय आहे प्रकरण?
संजय कुमार यांनी 17 ऑगस्टला एक ट्विट केले होते. त्यामध्ये 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील चार मतदारसंघांमधील मतदारांच्या संख्येत मोठा बदल दर्शविणारे आकडे पोस्ट केले होते. संजय कुमार यांनी ‘महाराष्ट्र निवडणुकीची काही माहिती’ या शीर्षकाखाली दोन स्वतंत्र ट्विट शेअर केले होते. यामध्ये एकत्रितपणे, त्यांनी चार मतदारसंघांमधील डेटा मांडला होता.
संजय कुमार यांनी दावा केला होता की, रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 4.66 लाखांवरून विधानसभा निवडणुकीत 2.86 लाखांवर आली. म्हणजेच 38..45 टक्क्यांनी घट झाली. देवळालीमध्येही असाच प्रकार दिसून आला, मतदारांची संख्या 4.56 लाखांवरून 2.88 लाखांवर आली आहे, म्हणजेच 36.82 टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट, नाशिक पश्चिममध्ये 47.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीत 3.28 लाखांवरून वाढून विधानसभा निवडणुकीत 4.79लाख झाली. हिंगणघाटमध्येही असामान्य वाढ दिसून आली, ती 3.14 लाखांवरून 4.5 लाखांवर पोहोचली, म्हणजेच 43.08टक्क्यांनी यात वाढ झाली. त्यानंतर संजय कुमार यांनी 19 ऑगस्टला पुन्हा पोस्ट करत आधीच्या पोस्ट चुकीच्या असल्याचे सांगत जाहीर माफी मागितली होती.