
मोदींनी अमेरिकेला सुनावलं; भारत झुकणार नाहीच!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे भारताचे मोठे नुकसान हो आहे. भारत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये बोलताना जागतिक व्यापारावर भाष्य केले. तसेच आम्ही कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढूच असा विश्वासही यावेळी मोदी यांनी व्यक्त केला. मोदी गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबाद येथे भव्य रोड शोमध्ये ते सामील झाले. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित करताना वरील भाष्य केले.
महात्मा गांधी यांचा केला उल्लेख
मोदी यांनी गुजरातमध्ये गेल्यानंतर 5400 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण, भूमिपूजन केले. यावेळी बोलताना त्यांनी सुदर्शनधारी कृष्णाचा आणि महात्मा गांधी यांचा उल्लेख केला. “गुजरात ही मोहन यांची धरती आहे. एक मोहन म्हणजे सुदर्शनधारी मोहन आहेत. दुसरे मोहन हे साबरमतीचे संत पूज्य बापू आहेत. या दोन महान व्यक्तींनी दाखवलेल्या रस्त्यानेच आज पुढे मार्गक्रमण करत आहे. सुदर्शनदारी मोहनने आपल्याला शिकवलं की देश आणि समाजाचे रक्षण कसे करायचे. त्यांनी सुदर्शन चक्राला न्याय आणि सुरक्षेचे कवच दिले. अशीच भावना आज भारताला अनुभवायला मिळत आहे,” असे मोदी म्हणाले.
भारताची ताकद संपूर्ण जगाने पाहिली
पुढे बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरही भाष्य केले. “आज आपण दहशतवादी आणि त्यांना आसरा देणाऱ्यांना आपण सोडत नाही. दहशतवादी कुठेही लपून बसलेले असले तरी आपण त्यांना शोधून काढतोच. पहलगामचा बदला भारताने नेमका कसा घेतला? हे संपूर्ण जगाने पाहिलेले आहे. ऑपरेशन सिंदूर आपल्या सेनेच्या पराक्रमाचे प्रतीक झाले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अमेरिकेला दिला थेट उत्तर
नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्यापारावरही यावेळी भाष्य केले. “जगात आज आर्थिक स्वार्थ साधणारी रणनीती पाहायला मिळत आहे. मी लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की मोदीसाठी तुमचे हित हेच सर्वतोपरी आहे. माझे सरकार लघु उद्योजक, शेतकरी, पशूपालकांचे कधीच नुकसान होऊ देणार नाही. दबाव टाकण्यासाठी कोणी कशीही रणनीती आखली तरी हा दबाव झेलण्यासाठी आपण आपली ताकद वाढवत राहू,” असे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडलेले आहेत. असे असतानाच आता मोदी यांनी केलेल्या या विधानाला आता फार महत्त्व आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.