
मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक आरक्षण देत नाहीत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलानाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी 29 जातींचा फडणवीसांनी ओबीसीत समावेश केला, याकडे लक्ष वेधत आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सरकार उलथवून टाकू असे ते म्हणाले.
मुंबईत 29 पासून उपोषणाचा पवित्रा कायम राहणार असल्याचे सांगतानाच आडमुठे कोण मराठे की फडणवीस हे मुंबईकरांनी ठरवावे, आम्ही मुंबई आंदोलनाची तारीख चार महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. चार महिन्यांत सरकारने काय केले, आपण दोन महिन्यांपूर्वी फडणवीस यांना फोन करून अंतरवालीमध्ये बोलाविले होते,असे त्यांनी सांगितले. मुंबईत जी परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीत आंदोलन करणार आहोत. पावसातही आंदोलन चालू राहील. आंदोलनात कीर्तन, पोवाडे कार्यक्रमाचंही आयोजन केले आहे. राज्यातील सर्व मराठ्यांनी काम धंदे बंद करावेत. आता मुंबई कडे जायची तयारी करावी. आता जगाच्या पाठीवर पुन्हा असा सोहळा होणार नाही. त्यामुळे या विजयाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे. मराठ्यांनी मुंबईत गर्दी केल्यास देश बंद पडू शकतो. या मोर्चात प्रत्येक मराठ्याने स्वयंसेवक म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकार या आंदोलनात एखादी टोळी घालण्याचा प्रयत्न करू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बसल.
शिंदे समितीला 58 लाख नोंदी सापडल्या. या नोंदीचा आधार घेत मागण्या पूर्ण कराव्यात. राजकीय पदावर बसलेल्या मराठ्यांनी यावेळी समाजाचे रक्षण करावे, समाजाच्या पाठीशी उभे राहा. अन्यथा समाज तुम्हाला विचारणारही नाही, मराठ्यांनी एक घर एक गाडी याप्रमाणे मुंबईत यावे असे ते म्हणाले.
शब्द मागे घेतो..
आपण फडणवीस यांच्या आईवर काहीही बोललेलो नाही. पण काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो.पण तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला, असे ते म्हणाले. जरांगे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही. म्हणून त्यांनी सोशल मीडियावरून आईचा सहारा घेतला असा आरोप त्यांनी केला. महाज्योती विद्यावेतन बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं वाटोळे होत असून, ते तातडीने सुरू करावे, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
असा राहणार मार्ग… अंतरवालीहूनच निघणार
27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवालीहून मुंबईकडे निघणार आहोत. पैठण – घोटन – तळणी – शेवगाव – पांढरीपूल – कल्याण फाटा – नारायणगाव मार्गे शिवनेरीगड येथे राहील. 28 ला शिवनेरीचे दर्शन घेऊन चाकण, लोणावळा, वाशीमार्गे 28 ला संध्याकाळी मुंबईत आझाद मैदानावर पोहचणार असून 29 ला सकाळी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत. मुंबईला जाण्यासाठी कोणता तरी एक मार्ग आम्हाला द्यावा, आम्ही कोणालाही त्रास देण्यासाठी जाणार नाही, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे उद्या मुंबईकडे कूच करणार
संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या आगमनात व्यस्त राहणार असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे दि. 27 ऑगस्टला कूच करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवार दि. 26 ऑगस्टपूर्वी कुणबीतून मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आपल्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही असे जाहीर करतानाच मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत 29 ला धडकणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असून, त्यांनी त्याचे सोने करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
अंतरवाली सराटी येथे सोमवारी पत्रपरिषदेत जरांगे यांनी चलो मुंबईची हाक दिली. 29 ऑगस्टला आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. समाजाच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही, असे सांगून ते म्हणाले, की मुंबई आंदोलनाची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. आपण स्वत: प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी बैठका घेतल्या आहेत.
गेवराईमध्ये पंडित समर्थकांनी जेव्हा गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रा. लश्मण हाके व त्यांच्या समर्थकांनी गाडीवर चढत असे प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला.
गेवराईमध्ये प्रा. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक
आ. विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक : गेवराईच्या मुख्य चौकात जोरदार घोषणाबाजी
गेवराई : ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सोमवारी (दि.25) सायंकाळी गेवराईत दाखल झाले होते. यावेळी आ. विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि याचवेळी हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या बैठकीत आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली होती. यानंतर आ. पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हाके यांच्या पुतळ्याचे दहनही गेवराईत करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सोमवारी (दि.25) सायंकाळी गेवराईत दाखल झाले.
गेवराई शहरातील मुख्य चौकात त्यांच्या वाहनांचा ताफा थांबलेला होता. याच ठिकाणी आ. विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्तेही एकत्र आले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजीला या ठिकाणी सुरुवात झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. परंतु दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होते. हाके यांचा ताफा सभेच्या ठिकाणाकडे निघत असताना पुन्हा कार्यकर्ते त्यांच्या गाडीसमोर आले आणि यावेळी एकच गोंधळ उडाला. याच गोंधळात काही कार्यकर्त्यांनी हाके यांच्या गाडीवर दगड फेकले. पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार करत कार्यकर्त्यांना पांगवले. यानंतर पोलिस बंदोबस्तात हाके यांचा ताफा सभेच्या ठिकाणाकडे रवाना झाला.
आमदार पंडित, आ.सोळंके, खा.सोनवणे यांनी राजीनामा द्यावा
लोकप्रतिनिधी हे सर्व समाजाचे प्रतिनिधी असतात. परंतु आ. विजयसिंह पंडित, आ.प्रकाश सोळुंके आणि खा. बजरंग सोनवणे यांनी राजीनामा द्यावा आणि मगच मराठा आंदोलनात उतरावे. माझ्या समाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी गेवराईत आलो होतो, तर यांनी बिल्डिंग वरून आणि टपर्या मागून दगडफेक केली. लपून-छपून काय हल्ले करतात? असे आव्हान देखील लक्ष्मण हाके यांनी दिले.