
दैनिक चालू वार्ता – शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अंतरवली सराटी येथे 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विराट मोर्चासाठी शिरूर तालुक्यातील शेकडो तरुण उत्साहाने रवाना झाले. हातात भगवे झेंडे, ओठांवर घोषणाबाजी आणि डोळ्यांत मराठा आरक्षणासाठी लढण्याची तळमळ घेऊन निघालेल्या युवकांनी परिसर दणाणून टाकला.
या मोर्चाला यशवंत संघर्ष सेनेचा विशेष पाठिंबा मिळाला असून संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा काफिला अंतरवली सराटीकडे रवाना झाला. यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजी गडदरे, उपाध्यक्ष संतोष कर्डिले, संपर्कप्रमुख सतीश सोनलकर, अनिल कोळपे, सचिन डोळे, ऋषिकेश गडदरे, भाऊ पुणेकर, शुभम गायकवाड, तसेच श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सोपान कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षण चळवळ आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. संपूर्ण राज्यभरातून या आंदोलनाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून, शिरूर तालुक्यातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग मराठा समाजाच्या संघटित शक्तीचे प्रतिक ठरत आहे.
“मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” अशा गर्जना देत निघालेल्या तरुणांच्या जोशात समाजाच्या हक्कासाठीची आस आणि एकजूट स्पष्ट दिसून आली.
या मोर्चामुळे शिरूर तालुक्यातील मराठा समाजाने राज्यव्यापी चळवळीला उर्जा दिली असून, इतिहास घडविणाऱ्या या लढ्यात शिरूरचा ठसा उमटला आहे.
–