
शिंदेंनीही ‘तो’ निर्णय तडकाफडकी बदलला…
एकीकडे आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मराठा वादळ मुंबईत धडकणार असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गाव गाठणार असल्याची माहिती समोर आली होती.
यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. पण आता याचदरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना काही अटी-शर्तींसह आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी पातळीवर जोरदार धावपळ सुरू झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे नवे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत जरांगेंची पुण्यात किंवा अहिल्यानगरमध्ये भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपला नियोजित दरे गावचा दौरा तडकाफडकी रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे हे गणेशोत्सवासाठी दरवर्षी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी जात असतात. मात्र, हा त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द करण्यामागचं नेमकं कारण काय अद्याप समोर आलेलं नाही.
एकनाथ शिंदे ज्या ज्यावेळी दरे गावी जातात,तेव्हा त्यामागं ते नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागतात. पण मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांनाच टार्गेट करण्यात येत असूनही शिंदे वा शिवसेनेचे मंत्री मात्र यावर मौन बाळगून असल्याचं दिसून आलं होतं.
एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या एका गोपनीय बैठकीत महत्त्वाच्या सूचना दिल्याचेही बोलले जात होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी त्यांच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य न करण्याची ताकीद शिंदेंनी दिल्याची चर्चा होती.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.पण त्याचसोबत काही अटी-शर्तींची बंधनही घातली आहेत. यामध्ये त्यांना एकाच दिवसासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत हे आंदोलन करता येणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी केवळ 5 हजार लोकांना या आंदोलनात सहभागी होता येईल, असंही बजावलं आहे. तसेच आंदोलनावेळी ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नसून गोंगाट करणाऱ्या उपकरणांचाही यावेळी आंदोलनस्थळी वापर करता येणार नाही. ठरवून दिलेल्या वेळेनंतर या मैदानात जरांगेंसह आंदोलकांना थांबता येणार नसल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलू दिले जात नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.
खरा माणूस हा एकनाथ शिंदे आहे, त्याला गरिबांची व्यथा समजते. अजित पवारही चांगले नेतृत्व आहेत. त्यांच्याकडे गेले की गोरगरीबांची कामे करून देतात. भाजपमधील अनेक मंत्री देखील चांगले आहेत ते चांगल काम करतात, असे म्हणत जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.