
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनची तलवार उपसली आहे. काल 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहून निघाले, आज ते मराठा आंदोलकांसह मुंबईला पोहोचतील.
दरम्यान मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या मोर्चाबाबत उद्धव ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मराठ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कबुतरांसाठी होणाऱ्या आंदोलनाला सरकार परवानगी देऊ शकते तर मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी असं राऊत म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले.
यावर आता भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. 14 टक्के आरक्षण दिलं, मराठा आर्थिक विकास महामंडळाचं पुनर्जीवन केलं. पण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. त्यामुळे आरक्षणाचं पाप उद्धव ठाकरेंचं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये मराठा मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणत व्यंगचित्र काढलं होतं. आमच्या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांची आरक्षणावर बोलण्याची पात्रता नाही, आधी त्यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली.
नवनाथ बन यांनी पुढे सांगितले की, “औरंगजेब फॅन क्लब प्रवक्ते पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करतात, पण महाराष्ट्राची जनता जाणते की महायुती सरकारने दिलेलं आरक्षण मविआ सरकारमुळेच गेलं होतं. त्या यामुळे राऊत यांनी आरक्षणावर बोलण्याऐवजी जनतेची माफी मागावी. इतर एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. याची आठवणही बन यांनी करून दिली.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना बन म्हणाले, “संजय राऊत यांची परंपरा कुबुद्धीची आहे का? देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या परंपरेवर बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही. गणपती बाप्पांकडे प्रार्थना करतो की सकाळी उठून बडबड करण्याची कुबुद्धी त्यांना देऊ नये.”
मनसे-शिवसेना नात्याबाबतही त्यांनी राऊतांना चिमटा काढला. ते म्हणाले, “तुम्हाला लाडका भाऊ आज आठवला. 2014 आणि 2019 ला राज ठाकरेंनी हात पुढे केला पण तुम्ही त्यांच्यासोबत गेला नाहीत. मात्र आता जनतेने घरी बसवल्यानंतर आणि आपलं दुकान बंद होऊ लागल्यानंतर भाऊ आठवतोय. येत्या काळात दोन भाऊ एकत्र राहावेत ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत. असं सांगायलाही ते विसरले नाहीत.