
केजरीवालांनी मोदी सरकारला दिला भन्नाट सल्ला; आकडेवारीच केली सादर !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ अर्थात आयात शुल्क लागू केल्यानं भारतातील व्यापाराला मोठा फटका बसला आहे. लाखो रोजगारही यामुळं गमवावे लागू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून काही प्रमाणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला महत्वाचा सल्ला दिला आहे.
भारतावर अमेरिकेचं ५० टक्के टॅरिफ
पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, “आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिकेनं तथा ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेनं जर गुंडगिरी करुन ५० टक्के टॅरिफ लावला तर आपण काय करायला पाहिजे होतं? आपल्याला कापसावरचा ११ टक्क्यांवरुन टॅरिफ ५० टक्के करायला पाहिजे होता. दुसऱ्या देशांनी हेच केलं आहे. युरोपियन युनियनमधून ज्या कार्स अमेरिकेत जातात त्यावर अमेरिकेनं २५ टक्के टॅरिफ लावलं तर युरोपियन युनियननं अमेरिकेतून येणाऱ्या मोटर सायकलवर ५० टक्के टॅरिफ लावलं. यामुळं ट्रम्प यांना झुकावं या लागलं.
‘या’ देशांपुढं झुकावं लागलं
चीनवर अमेरिकेन १० टक्क्यांवरुन १४५ टक्के टॅरिफ लावलं तर चीननं देखील अमिरेकेवर १२५ टक्के टॅरिफ लावलं. भीतीमुळं ट्रम्पला याबाबत झुकावं लागलं. कॅनडावर ३५ टक्के टॅरिफ लावलं तर कॅनडानं २५ टक्के टॅरिफ लावलं. याचा परिणाम काय झाला? तर ट्रम्प यांना झुकावं लागलं. मेक्सिको, कोलंबिया, कॅनडा, युरोपियन युनियन, चीन प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की, त्यांच्या सरकारांनी उभं राहून ट्रम्प यांना धाडसानं प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्रम्प भित्रे माणूस
ट्रम्प हे भित्रे माणूस आहेत कारण त्यांना ज्या देशानं प्रत्युत्तर दिलं त्यांच्यासमोर त्यांना झुकावं लागलं आहे. पण मोदींची नेमकी अडचण काय आहे माहिती नाही? ते ट्रम्प यांच्यासमोर मांजरीप्रमाणं उभे आहेत. आज आपला देश दोन बाजुंनी मार खात आहे. एकीकडं ट्रम्प यांनी आपल्या निर्यातीवर ५० टक्के शुल्क (टॅरिफ) लावलं. त्यामुळं आपलं जे काही स्थानिक उद्योग क्षेत्र आहे ते पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे कारण आपली निर्यातच बंद झाली आहे.
भारतानं नमकं काय करावं?
याबदल्यात आपल्या मोदींनी अमेरिकेतून जो माल भारतात येत होता त्यावरील टॅरिफ संपवून टाकला आहे. त्यामुळं आता अमेरिकेतून आलेला माल आपल्या बाजारांमध्ये दिसेल त्यामुळं आपले उद्योगपती आणि व्यापारी सर्वजण बरबाद होऊन जातील. दुसरीकडं ट्रम्प यांनी जर आपल्यावर ५० टक्के टॅरिफ लावला असेल तर आपणही त्यांच्यावर १०० टक्के टॅरिफ लावायला पाहिजे होतं. आपण काय कमजोर देश आहोत का? आज जर १४० कोटी लोकांचा आपला देश आहे. १४० कोटी लोक कमी नाहीत, आपलं मार्केट हे खूपच मोठं मार्केट आहे.