
राज ठाकरे नेमकं आणि सूचक बोलले…
मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते.
त्यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना गाठलं. मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील या विषयावर राज ठाकरे यांनी खूप सूचक प्रतिक्रिया दिली. “मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील” असं राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना, मग हे परत का आले?” असं राज ठाकरे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईत आज वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. काही मराठा आंदोलक हे आझाद मैदानानजीक मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलनाला बसले होते. यामुळे मोठी वाहतूककोडीं झाली. सलग दुसऱ्या दिवशी ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे स्वत: मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना पोलिसांनी सांगितलय त्यानुसार पार्किंग करा, मोकळ्या मैदानात गाड्या लावा असं सांगितलं.
‘ते परशुराम महामंडळवाले’
दरम्यान आज राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेच मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतील. राज ठाकरे यांचं हे विधान खूपच सूचक आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आज एक आरोप केला. “महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत, मिध्यांचा ( शिंदे गट) विषय वेगळा आहे. फडणवीसांना अडचणीत आणण्याशाठी शिंदे हे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत” असा आरोप राऊतांनी केला. “देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत आणि मिस्टर अजित पवार हे तर चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाहीये. अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.