
गिरीश महाजनांना मराठा आंदोलनापासून लांब का ठेवलं…
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन तीन दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाबाबत जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मात्र, प्रत्येक आंदोलनात आणि अडचणीत पुढे येणारा महायुती सरकारमधील एक मंत्री यावेळी गायब असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवेली सराटी येथे दोन वर्षांपूर्वी उपोषण केले. या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने अनेक चर्चेच्या फेरी झाल्या होत्या. त्यात गिरीश महाजन यांची प्रमुख भूमिका राहिली होती. राज्य सरकारचे कोणत्याही प्रश्नात पुढाकार घेऊन तोडगा काढणारे सर्वाधिक सक्रिय मंत्री म्हणून गिरीश महाजन सातत्याने चर्चेत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके समजले जातात. भाजपचे संकट मोचक अशी देखील त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली.
मात्र सध्या मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत सरकारमधील उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांसह प्रमुख नेत्यांनी मत प्रदर्शन केले. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या सगळ्यांत कुठेही चर्चेत आले नाहीत.
मराठा आरक्षणाचे यापूर्वी झालेले अंतरवेली सराटी यांसह विविध आंदोलनांमध्ये महाजन यांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाच्या वतीने याबाबत त्यांना जाणीवपूर्वक चर्चेसाठी पाठविण्यात येत होते. मात्र यापूर्वीच्या काही बैठकांमध्ये जरांगे पाटील आणि मंत्री महाजन यांच्यात चांगलीच जुंपली होती. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे देखील महाजन यांच्या विषयी फारसे सकारात्मक नव्हते, असे बोलले जाते.
यापूर्वीच्या आंदोलनात नवी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगे पाटील यांना भेटले होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. राज्य शासनाच्या वतीने त्या बाबतचे पत्र देखील देण्यात आले. मात्र आरक्षणाची ही घोषणा न्यायालयीन जंजाळात अडकली. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या आंदोलनाबाबत शासनाची उपसमिती आणि कोकणचे विभागीय महसूल आयुक्त शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. या उपसमितीची बैठक शनिवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी झाली.
मंत्री महाजन उपस्थित असल्याचे दिसले. याव्यतिरिक्त त्यांनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य अथवा भूमिका घेतलेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे हनुमान अशी प्रतिमा असलेले मंत्री महाजन त्यामुळेच सध्या चर्चेचा विषय आहे.