
माजी मंत्री राजेश टोपे यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारसाहेब हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी रविवारी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रात्री उशीरा राजेश टोपे हे जरांगेंची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर आले. जरांगे पाटील यांनी देखील टोपेंशी संवाद साधला. दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले ते समजू शकले नाही. मात्र, उद्या शरद पवार तु्म्हाला भेटायला येतील, असा निरोप टोपेंनी दिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी साम टिव्हीशी बोलताना टोपे यांनी उद्या शरद पवारसाहेब येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती काम करत आहे. उपसमितीच्या बैठकांचा धडाका चालू असतानाच शनिवारी समितीचे अध्यक्ष माजी न्यायाधीश शिंदे आणि समितीमधील सदस्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर देखील जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत.
मविआच्या नेत्यांकडून मदत
आझाद मैदान आणि परिसरात आंदोलकांसाठी पुरेशा व्यवस्था नसल्याने आंदोलकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते आमदार, खासदार यांच्याकडून मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच शनिवारी देखील जरांगे पाटलांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग लागली होती. महाविकास आघाडीच्या आमदार, खासदार आणि नेत्यांसोबत AIMIM पक्षाचे नेते देखील जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते.
आरक्षणाता तिढा संसदेत सुटेल
शरद पवार यांनी शनिवारी अहिल्यानगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “राज्यघटनेत आरक्षणाची मर्यादा 50 ते 52 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, केंद्राने तामिळनाडूसारख्या राज्यांत 72 टक्के आरक्षण दिले. ते न्यायालयातही टिकले. त्यामुळे हा आरक्षणाचा तिढा आता संसदेमध्येच सुटेल. त्यासाठी आम्ही प्रत्येक राज्यासोबत संपर्क साधत आहोत. प्रसंगी घटनादुरुस्ती करावी लागेल. मात्र, यासाठी केंद्र सरकारची स्वच्छ व पारदर्शक भूमिका असणे गरजेचे आहे, यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहे.