
मराठा समाज अधिक आक्रमक होतोय…
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून सोमवारीही आंदोलनास पोलिसांनी परवानगी दिली आहे.
यामुळे जसा जरांगे यांनी निर्धार केला होता. तसे ते आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाहीत हे ठाम आहे. दरम्यान भाजप आमदार तथा मंत्री यांच्या स्फोटक वक्तव्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून मराठाही आक्रमक होताना दिसत आहेत. ज्यात भाजप आमदार संजय केनेकर मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांची नावे आघाडीवर आहेत. त्यांच्या या विविध वक्तव्यांचा मनोज जरांगे पाटील यांनी समाचार घेत जोरदार पलटवार देखील केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज उपोषणावर बसले आहेत. तर हजारो मराठा आंदोलक भर पावसात कशाचीही पर्वा न करता आझाद मैदानापासून ते वाशीपर्यंत आंदोलनाचा भाग बनले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यातील गावा-गावात मराठा आंदोलन करून आपणही या आंदोलनात सहभागी असल्याचे सांगत आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीतील आमदार आणि खासदारांसह महत्वाचे नेते जरांगे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान महायुतीतील काही आमदार जरांगेंच्या या आंदोलानास पाठिंबा देताना दिसत आहेत. तर काही नेते प्रक्षोभक वक्तव्य करून हे आंदोलन कसे चिघळेल याकडे लक्ष देताना दिसत आहे.
भाजप आमदार संजय केनेकर
भाजप आमदार संजय केनेकर यांनी असेच स्फोटक वक्तव्य करून राज्यात मराठा कार्यकर्त्यांना उकसवण्याचे काम केलं आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करताना जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचे म्हणत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिलीय.
केनेकर यांनी, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिले जातं. खऱ्या अर्थाने हे सुसाईड बॉम्बच बूमरँग होणार असून ते शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत द्वेषापायी सोडलं आहे. त्याचा परिणाम सध्या मुंबईला भोगावे लागत असून मुंबईकरांना मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं होते.
चंद्रकांतदादा पाटलांचे आंदोलकांना खडे बोल
दरम्यान पंढरपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील मराठा आरक्षणावर मोठे भाष्य केले होते. त्यांनी भाजपची बाजू मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. यामुळेही राज्यातील मराठ्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळळी होती.
पाटील यांनी, फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असून कायदेशीरदृष्ट्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. मराठा सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहेत. तर हे आंदोलन फक्त गावच्या सरपंच आणि राजकारणासाठी केलं जातयं असा दावा केला होता. या दाव्यानंतर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केलीय.
नितेश राणेंची जीभ हातात देण्याची भाषा
दरम्यान जरांगे यांच्या आदोलनावर भाजप मंत्री नितेश राणे यांनी देखील तिखट प्रतिक्रिया दिली होती. जरांगे यांनी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जचा उल्लेख करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनी फडणवीस यांच्या मातोश्रींच्या उल्लेख केला होता. ज्यानंतर नितेश राणे यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपतींचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम आई-बहिणींचा आदर केला. जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जरूर लढावी. मात्र, आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत करू नये. तसं कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये असल्याचा इशारा दिला होता.
नितेश राणेंच्या इशाऱ्याला दोन वाक्यात उत्तर
अशा विविध नेत्यांच्या स्फोटक वक्तव्यांमुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली असतानाच जरांगे पाटील यांनी आपल्या भाषेत भाजपच्या या नेत्यांचा समाचार घेतला आहे. जरांगे यांनी जीभ हातात काढून देण्याच्या नितेश राणेंच्या इशाऱ्याला दोन वाक्यात उत्तर दिले आहे.
त्यांनी राणेंचा उल्लेख चिंचुद्री असा करताना, चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहे का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, त्या चिंचुद्रीकडे बघतोच. तसेचही आपण राणेंना आवरा असे सांगितले होते. पण असो आता बघूच असा सज्जड दमही जरांगे यांनी भरला.
उगाच वचवच करून शिव्या खाऊ नका
तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांवर हल्लाबोल करताना, चंद्रकांत पाटलांना अक्कल आहे काय? असती तर समितीवरून त्यांना काढून टाकलं नसतं, असा पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांनी कसा खेळ खेळला? मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन मराठा तरुणांच्या व्हॅलिडिटी कशा रोखून धरल्या याची सर्व माहिती आम्हाला आहे. त्यामुळे उगाच वचवच करून विनाकारण मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका, कोल्हापूर म्हणजे तू आमच्या राजघराण्याच्या कचाट्यात असल्याचा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान आता वाद चिघळू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात भांडणे लावू नका, अशी भूमिका घेत आपल्या विधानाची सारवासारव केली आहे. त्यांनी, मनोज जरांगे पाटील आणि मी खूप चांगले मित्र असून सुरुवातीच्या काळात अनेक बैठकांना आम्ही एकत्र बसलो आहोत.
त्यामुळे माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात भांडण लावू नका, असे आवाहन केले आहे. जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे मी ही कुणबी आणि ओबीसीमधून आरक्षण मिळेल असे म्हणतो. पण तसे काही होणार आहे का? त्यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर सर्व प्रयत्न सुरू आहेत. मग ते ओबीसीतून मिळो किंवा कुणबीतून. यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले होते.