
चीनने शरीफ यांची साथ सोडली; ‘या’ मुद्द्यावर भारताला दिला पाठिंबा…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनला गेलेले आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली.
यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याचा भारतासह चीनलाही फटका बसू शकते असं मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चीनने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानला फटका बसला आहे.
चीनचा भारताला पाठिंबा
भारत बऱ्याच वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. भारताचा शत्रू देश पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत आहे, हेच दहशतवादी भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोदींनी सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच याचा चीनलाही धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता चीनने याबाबत भारताला पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे म्हणाले की, ‘आज झालेल्या बैठकीप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारत आणि चीन या दोघांनाही याचा धोका आहे. त्यामुळे या दहशतवादाला तोंड देण्यासाठी आपण एकमेकांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी भारताला चीनचे सहकार्य मिळाले आहे.’
सीमावादावरही चर्चा
आज झालेल्या बैठकीत चीनसोबत असलेल्या सीमा वादावरही चर्चा झाली. सीमेवर शांतता राखणे हे भारत-चीन संबंधांसाठी महत्वाचे आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमधील सैन्यात तणाव निर्माण झाला होता, मात्र आता हा प्रश्न कायमचा सुटण्याची शक्यता आहे.
चीनने दिला होता पाकिस्तानला पाठिंबा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यावेळी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी हवाई हल्ले करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता, या तणावाच्या काळात तुर्की आणि चीनने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. या काळात पाकिस्तानने चिनी लढाऊ विमाने आणि तुर्की ड्रोनचा वापर केला. मात्र काही दिवसांनंतर युद्धबंदी झाली. त्यानंतर आता दहशतवादाबाबत चीनने भारताला पाठिंबा दिला आहे.