
पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची कास्तकारांना प्रतिक्षा आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत त्यांनी कॉल सेंटर्स आणि इतर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी आणि सुचना एकाच ठिकाणी प्राप्त करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. आता शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कृषीविषयक तक्रारी एकाच पोर्टलवर करता येतील. त्यामुळे या तक्रारींचा तात्काळ निपटारा करता येईल. काय आहे ही अपडेट?
कृषीमंत्री घालतील लक्ष
कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे जातीने लक्ष घालतील. ते या तक्रारींची नियमीत समीक्षा करतील. PM Kisan Samman Nidhi Yojan च्या 21 व्या हप्त्यापूर्वीच सरकारने हे मोठे पाऊल उचले आहे. तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल तयार झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेपासून ते इतर सर्व तक्रारींसाठी एकच मंच असेल. त्यांच्या तक्रारीवर लवकर तोडगा काढण्यात येईल.
तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी आणि हेल्पलाईनवर येणारे कॉल्स यांची समीक्षा केली. त्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देश दिले. या पोर्टलवर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये असे त्यांनी बजावले. या तक्रारीसंबंधी काय कार्यवाही केली याची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न होणार आहे. तर तक्रार आल्यानंतर ती एका विहित मुदतीत दूर करावी लागणार आहे.
शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी?
गेल्या महिन्यात 2 ऑगस्ट रोजी शेतकरी सन्मान योजनेचा, पीएम किसानचा 20 वा हप्ता जमा झाला होता. आता शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता या हप्त्याविषयी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. पण काही वृत्तानुसार हा हप्ता नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात मिळू शकतो. कारण सरकार दर 4 महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. एका वर्षात तीन हप्ते जमा करण्यात येतात. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यात येतात.