
पुण्याला जाण्याची का हवी होती परवानगी…
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर जोरदार टीका केली. पण फार कमी लोकांना माहिती असेल की त्यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी भारतात त्यांचा रियल इस्टेट व्यवसाय सुरु केला होता.
तेव्हा कोणालाही वाटले नसेल की हा माणूस एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल. साधारण 11-12 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा डोनाल्ट ट्रम्प हे त्यांच्या खासगी विमानाने भारतात आले होते. त्यांना पुण्याला जायचे होते. पण त्यांचे विमान मुंबई विमानतळावर बराच वेळ थांबवण्यात आले होते. त्यांनी परवानगी मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…
ट्रम्प यांचे विमान न्यूयॉर्कहून मुंबईत आले तेव्हा…
ट्रम्प हे त्यांच्या खासगी बोइंग 757 विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर परवानगी नसल्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावर थांबावे लागले होते. जवळपास तीन तासांहून अधिककाळ वाट पाहिल्यानंतर त्यांना उड्डाणाची परवानगी मिळाली होती.. तेव्हा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष नव्हते. ते केवळ एक यशस्वी उद्योगपती आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. हा प्रसंग ऑगस्ट 2014मधील आहे. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षात आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवेळी ते जगभरात आपला रिअल इस्टेट व्यवसाय वाढवण्याचा देखील प्रयत्न करत होते. भारताला त्यावेळी त्यांनी विकसीत देश असल्यामुळे संधींचा देश मानले होते. याच कारणामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांत भारतात आपला व्यवसाय वाढवला आहे.
पुणे आणि मुंबईत ट्रम्प टॉवरचे प्रस्ताव
त्यावेळी ट्रम्प त्यांच्याकडे पुणे आणि मुंबईतून दोन चांगल्या ऑफर आल्या होत्या. दोन मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी या दोन्ही शहरांत ट्रम्प टॉवर बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. याच संदर्भात ट्रम्प आपल्या आलिशान खासगी विमानाने भारतात आले होते. त्यांचे विमान न्यूयॉर्कहून भारतासाठी उडाले तर खरे पण नंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. 11 ऑगस्ट रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर ट्रम्प हे तीन तासापेक्षा जास्तवेळ विमानातच बसून होते.
मुंबई विमानतळावर तीन तासांहून अधिक वेळ थांबले विमान
ट्रम्प यांच्या विमानाचे मुंबईतून रात्री 9 वाजता पुण्यासाठी उड्डाण करायचे होते. पण त्यांच्या विमानाला उड्डाणाची परवानगी मिळालीच नाही. त्यांच्याकडे पुण्याच्या विमानतळावर उतरण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे, ट्रम्प यांचे विमान मुंबई विमानतळावरच तीन तासांहून अधिक वेळ थांबले. पुण्याचे लोहेगाव विमानतळ भारतीय हवाई दलाच्या हद्दीत आहे. येथे कोणत्याही परदेशी खासगी विमानाला उतरण्यासाठी आधी हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते. ट्रम्प यांना अंदाजच नव्हता की भारतात अशी परिस्थिती ओढावू शकते.
विमानातच बसून होते ट्रम्प आणि त्यांची टीम
‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, ट्रम्प यांचे विमान साडेतीन तास विमानतळावर थांबले. ट्रम्प आणि त्यांचे सहकारी विमानातच बसून होते. विमानाच्या चालकाने कितीही विनवण्या केल्या, तरी मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी विमानाला पुण्याला जाण्याची परवानगी दिली नाही. ट्रम्प यामुळे खूप चिडले आणि वैतागले. दरम्यान, ट्रम्प यांची सहकारी टीम, अमेरिकन दूतावास आणि भारतातील त्यांचे प्रोमोटर्स सक्रिय झाले. रात्री 12:30 वाजता हवाई दलाच्या मुख्यालयाने त्यांच्या विमानाला पुण्याच्या विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली, तेव्हाच त्यांचे विमान मुंबईतून निघाले.
पुण्यात आली आणखी एक अडचण
पण ट्रम्प यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत. पुण्यात गेल्यानंतर त्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागला. अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर जेव्हा ट्रम्प यांचे विमान पुण्यात उतरले, तेव्हा त्या विमानाची उंची काहीशी जास्त होती. विमानतळावर त्याला लागणाऱ्या योग्य शिड्या उपलब्ध नव्हत्या. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर तात्पुरत्या शिड्यांची व्यवस्था करण्यात आली, तेव्हा ट्रम्प विमानातून खाली उतरले. हा ट्रम्प यांचा पहिला भारत दौरा होता.
राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पुन्हा भारतात आले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ते भारतात आले. तेव्हा त्यांचे भारताशी खूप चांगले संबंध होते. पण या दुसऱ्या कार्यकाळात भारताशी त्यांचे संबंध बिघडले असल्याचे दिसत आहे. 50 टक्के टॅरिफ लावण्याबरोबरच त्यांनी भारत आणि त्याच्या अर्थव्यवस्थेबाबत अपमानजनक टिप्पण्या केल्या आहेत.
ट्रम्प यांचे खासगी बोइंग जेट कसे होते?
राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प सरकारी विमान एअरफोर्स वनने प्रवास करतात. पण त्यांच्याकडे स्वतःचे खासगी जेटही आहे. ट्रम्प यांनी 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांच्याकडून हे बोइंग 757 विमान खरेदी केले होते. त्यांनी हे विमान सुमारे 700 कोटींना खरेदी केले आणि आपल्या पद्धतीने ते संपूर्ण डिझाइन केले. या विमानाची प्रवासी क्षमता साधारण 180 ते 200 लोकांची आहे. पण त्यांनी याला पुन्हा अशा प्रकारे डिझाइन केले की त्यात 43 लोक आरामात बसू शकतात.
जगातील सर्वात महागड्या खासगी विमानांपैकी एक
हे विमान एकदम खास पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. या विमानात ट्रम्प यांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खास बेडरूम, व्हिडीओ कॉन्फरन्स रूम, गेस्ट रूम आणि डायनिंग रूम देखील आहे. 2015-16 मध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी याच विमानाचा वापर केला. हे विमान जगातील सर्वात महागड्या खासगी जेट्सपैकी एक मानले जाते. तसेच, हे सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. हे विमान ताशी सुमारे 500 मैल वेगाने जाते.
ट्रम्प यांच्या विमानाच्या सजावटीसाठी सोन्याचा वापर
या विमानात रोल्स रॉयसचे शक्तिशाली टर्बो इंजिन आहे. जर हे विमान एक तास उड्डाण करते, तर त्यासाठी सुमारे 7-8 लाख रुपये खर्च येतो.विमानात इंटिरिअर डेकोरेशनसाठी सोन्याचा वापर करण्यात आला आहे. काही ठिकाणी सोन्याच्या प्लेट्स आणि नळ्या लावल्या आहेत. विमानाचे इंटिरिअर अतिशय दुर्मिळ आहे. सध्याच्या जागतिक नेत्यांपैकी ट्रम्प हे कदाचित एकमेव नेते असतील, ज्यांच्याकडे स्वतःचे खासगी बोइंग जेट आहे. ते याला प्रेमाने ‘टी-बर्ड’ म्हणजेच ‘ट्रम्प बर्ड’ म्हणतात.
या विमानाची किंमत किती?
ट्रम्प यांचे बोइंग 757 विमान 1991मध्ये तयार करण्यात आले होते. 2011 मध्ये त्यांनी ते खरेदी केले आणि आतमध्ये सुधारणा केली. विमानात असलेल्या बेडवरील उशांना सोन्याची बटणे लावण्यात आली आहेत. तसेच बाथरुममधील नळ देखील सोन्याचा आहे. तसेच या विमानात 52 इंची टीव्ही देखील लावण्यात आला आहे. या विमानाची किंमत 650 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे म्हटले जाते. ट्रम्प यांची संपत्ती 20150 कोटी आहे. त्यापैकी बोइंग 757 विमान हे देखील एक आहे.
मे महिन्यात डोनाल्ट ट्रम्प यांना आणखी एक प्रायवेट विमान भेट म्हणून मिळाले आहे. मे 2025मध्ये ट्रम्प कतारमधील शाही परिवाराला भेटले होते. या शाही परिवाराने त्यांना फ्लाइंग पॅलेस बोइंग 747-8 जंबो जेट गिफ्ट दिल्याचे म्हटले जात आहे. या जेटची किंमत 400 मिलियन डॉलर्स, भारतीय चलनानुसार 3,400 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती.