
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून ओबीसी समाजात नाराजीची भावना आहे. यावर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वपूर्ण विधान करत ओबीसींना आश्वस्त केलं आहे.”ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
यासाठी स्वतंत्र उपसमिती गठित करण्यात आली आहे,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
त्या म्हणाल्या, “माझी ही भूमिका आधीपासूनच कायम आहे आणि पुढेही तशीच राहील. आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन वेगवेगळे विषय आहेत. मराठा समाजासाठी जीआर काढताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये याची खबरदारी सरकार घेत आहे.”तसेच, “जर ओबीसींना जीआरमुळे अन्याय होईल असं वाटत असेल, तर त्यावर तपासणीसाठी दोन महिन्यांचा अवधी आहे. आम्ही सखोल तपासून पाहू. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही हा सरकारचा शब्द आहे, असं पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिलं.
राज्य सरकार सुवर्णमध्य काढेल अशी अपेक्षा व्यक्त करत, सगळे समाज आनंदात नांदावेत, हीच माझी इच्छा आहे, असंही त्या म्हणाल्या.