
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधून ‘ही’ सर्वात मोठी मागणी समोर…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ‘आरपार’ची लढाई छेडली होती. अखेर त्यांच्या लढ्याला मोठं यश आलं असून मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस बेमुदत उपोषण केल्यानंतर सरकारनं त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करतानाच आता हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण यानंतर सरकारच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरमधून मोठी अपडेट समोर आली आहे.
नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत शुक्रवारी (ता.5) मोठं विधान केलं आहे. त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत महत्त्वाची मागणी केली आहे. राजे मुधोजी भोसले यांनी मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी केली आहे.याविषयीच्या मागणीचे पत्रही त्यांनी फडणवीसांना दिलं आहे.
मुधोजी राजे यांनी या पत्रात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मात्र, त्यांनी जी मागणी केली की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं? असा सवाल केला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आंदोलन केलं. यामध्ये मराठ्यांना काय मिळालं? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
मुधोजीराजे भोसले पत्रात म्हणतात, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात अर्थात काही त्रुटी आहेत. परंतू ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना नक्कीच लाभ मिळावा. कागदपत्रांची पूर्तता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार आहे, यात शंका नाही. अशा उर्वरित अंदाजे 2.50 कोटी मराठ्याचं काय आहे? असा प्रश्नही भोसले यांनी केला आहे.
याचदरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझं व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावे, जेणेकरुन हा पेच निर्माण होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनचं मराठा आरक्षणाचा फायदा होईल असे राजे मुधोजी भोसले यांनी पत्रात म्हटलं आहे.
मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण द्यावे, जेणेकरुन 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे +उर्वरीत 2.50 कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल असा दावाही नागपूरचे राजे मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे.
टीम जरांगेमधील वकील योगेश केदार यांनी ‘मराठ्यांना GR पटलाच नव्हता’ असे मोठे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, सरकारकडून काढण्यात आलेला जीआर हा समाजाचा विश्वासघात करणारा आहे. त्यामुळे योगेश केदार यांनी या जीआर बाबत माहिती असताना समाजाला त्याची माहिती दिली नाही. याचा अर्थ केदार यांनी समाजाची फसवणूक केली असती असा झाला असता. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलकांची वाशी येथे झाल्याप्रमाणे फसवणूक झाली असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.