
लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ केला मोठा खुलासा; कारणही सांगितले…
दक्षिण आफ्रिकेच्या T20 फ्रँचायझी लीग SA 20 (SA20) सीझन-4 चा लिलाव 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या लीगचे कमिशनर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय खेळाडूंना लिलावाच्या यादीत स्थान देण्यात येणार नाही.
त्यांनी “उपलब्धतेबाबत स्पष्टतेचा अभाव” हे यामागील मुख्य कारण देखील सांगितले आहे.
हा लिलाव 9 सप्टेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे पार पडेल. ज्यामध्ये एकूण 241 परदेशी आणि 308 स्थानिक खेळाडू नोंदणीकृत असणार आहेत. यापैकी 25 परदेशी आणि 59 दक्षिण आफ्रिकन खेळाडू लीगमध्ये स्थान मिळविण्यासाठी बोलीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. स्मिथकडून भारतीय माध्यमांना सांगण्यात आले आहे की, एकूण 13-14 भारतीय खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी करण्यात आली होती.
SA20साठी ‘या’ खेळाडूंनी नोंदणी केली होती
SA20 लिलावासाठी नोंदणी करण्यात आलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये पियुष चावला, सिद्धार्थ कौल, सरुल कंवर, अंकित राजपूत, अनुरीत सिंग कथुरिया, अन्सारी मारौफ, महेश अहिर, निखिल जगा, इम्रान खान, मोहम्मद फैद, केएस नवीन, वेंकटेश गल्लीपल्ली आणि अतुल यादव या खेळाडूंचा समावेश होता. यापैकी कोणीही खेळाडू अंतिम यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.
बीसीसीआयचे धोरण ठरतोय मोठा अडथळा
भारतात सक्रिय असणारे खेळाडू, मग ते आंतरराष्ट्रीय असो वा देशांतर्गत, बीसीसीआयच्या परवानगीशिवाय परदेशी लीगमध्ये सहभाग नोंदवू शकत नाहीत. यासाठी, खेळाडूंना प्रथम भारतीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमधून निवृत्ती स्वीकारावी लागणार आणि नंतर बोर्डाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावे लागेल. अलीकडेच, भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनकडून यूएईच्या ILT20 लीगसाठी नोंदणी करण्यात आली आहे. ज्यामुळे तो आता देशांतर्गत कोणतेही सामने खेळताना दिसणार नाही हे आता निश्चित झाले आहे.
‘हा’ पहिला भारतीय खेळाडू ठरला..
भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने २०२४ मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यानंतर तो SA20 लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याने काही सामन्यांमध्ये आपली छाप पाडली होती. तसेच त्याने जानेवारी २०२५ मध्ये त्याने पार्ल रॉयल्ससाठी पदार्पण केले आहे.
सौरव गांगुली प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची आगामी हंगामात प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ याबाबत बोलताना म्हणाला की, “‘दादा’ सारखा दिग्गज प्रशिक्षक असणे आमच्यासाठी रोमांचक असणार आहे. त्याच्या अनुभवाचा खेळाडूंना नक्कीच फायदा होणार. मला विश्वास आहे की तो लिलावात चांगले खेळाडू जोडण्यात महत्त्वाची भूमिका वठवेल.