
किंमत पाहून विस्फारतील डोळे !
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी भारतातील पहिली टेस्ला कार खरेदी केली आहे. टेस्ला कंपनीकडून ही गाडी सरनाईकांना प्रदान करण्यात आली. या गाडीची किंमत जवळपास 60 ते 70 लाख रुपयांच्या घरात आहे.
या खरेदीबद्दल सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी आनंद व्यक्त केला. “टेस्ला ही जगातील सगळ्यांत लोकप्रिय इलेक्ट्रीक गाड्यांची कंपनी आहे. या कंपनीची ‘वाय’ मॉडेलची देशातील पहिली कार आज आमच्या परिवाराला मिळाली आहे. नक्कीच, आम्हाला खूप आनंद झाला आहे,” असं ते म्हणाले.
इलेक्ट्रीक गाडी, पर्यावरणाचा विचार करून बनवलेली गाडी आणि खासकरून एक वेगळी जागरुकता निर्माण करणारी गाडी आमच्या घरात आली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे,” असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सरनाईकांनी त्यांच्या नातूसाठी ही कार खरेदी केली आहे.
आम्ही परदेशात होतो आणि माझा मुलगा रेयांश हा गाड्यांसाठी अक्षरश: वेडा आहे. तो तीन वर्षांचा आहे, पण त्याला सगळ्या गाड्यांची नावं, त्यांचे मॉडेल्स, इंजिन वगैरे कसा आहे.. हे त्याला माहीत आहे. परदेशात असताना तो टेस्ला कंपनीच्या गाडीत बसला होता आणि त्यावेळी त्याने आजोबांना सांगितलं की, मला टेस्ला कार पाहिजे,” असं पूर्वेश यांनी सांगितलं.
त्याच्या आजोबांनी आज हे त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. देशाची पहिली टेस्लाची गाडी त्याला मिळतेय, त्यामुळे तो पण खूप खुश आहे. आता वेगळाच उत्साह त्याच्यात पहायला मिळणार आहे. कारण आजोबा आणि नातूची ही गाडी असणार आहे. आजोबा जेव्हा जिमला जातील किंवा नातूला शाळेत सोडायला जातील, तेव्हा हीच गाडी घेऊन जातील”, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.