
महाराष्ट्रातील लाखो मच्छीमारांनी महिनाभरापूर्वी मासेमारीला सुरुवात केली असतानाच चीनच्या ६०० अवाढव्य फॅक्ट्री जहाजांसह परप्रांतीय मच्छीमार बोटींनी राज्याच्या सागरी हद्दीत हैदोस घालत लाखो टन मासळीची लूट सुरू केली आहे.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विदेशी व परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र, राज्याचा बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात या परराज्यांतील शेकडो मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत आहेत. परप्रांतातून येणाऱ्या ४२७ हाॅर्सपाॅवरपर्यंत क्षमतेच्या मासेमारी बोटी मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जयगड या हद्दीत अक्षरश: धुडगूस घालून लाखो टन मासळी लुटून नेत आहेत.
अवैध मासेमारी
राज्यातील मच्छीमार व्यवसाय विविध समस्यांमुळे कोलमडला आहे. मागील महिनाभरात वादळ, जोरदार पाऊस, खराब हवामानामुळे काही दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यात या अवैध मासेमारी करणाऱ्या चिनी व परप्रांतीय मच्छीमारांची भर पडली आहे.
२०० सागरी नॉटिकल मैलाच्या आत शिरकाव
चीनच्या हजारो टन क्षमतेच्या ५०० ते ६०० अवाढव्य फॅक्ट्री जहाजांची राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी झाली आहे. २०० सागरी नॉटिकल मैलाच्या आतही ५० ते १०० मीटर लांबीच्या व हजारो टन साठवणूक क्षमता असलेल्या मासेमारी करणाऱ्या जहाजांना नौदलालाही ओळखणे कठीण होते. चीनची जहाजे पकडली तरी ते कोणती ठोस कारणे देत सुटका करून घेतात, हा प्रश्नच आहे.
“चीनच्या मच्छीमार बोटी स्थलांतरित होणारे मासे मोठ्या प्रमाणावर पकडतात. यामुळे राज्यातील मच्छीमारांचे नुकसान होते”, अशी माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. “कारवाईअभावी परप्रांतीय मच्छीमार बोटींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. घुसखोरीची दृश्य व्हेसल ट्रॅकर सिस्टमवरही दिसतात. मात्र, कारवाईच होत नाही”, असे वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशन संचालक रमेश नाखवा म्हणाले.